सुर्लीच्या आखाड्यात होतेय ‘दंगल’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:10 PM2017-12-17T23:10:02+5:302017-12-17T23:10:02+5:30
ओगलेवाडी : ‘पैलवानांची पंढरी’ म्हणून परिसरात ओळख असलेल्या सुर्ली गावात आता मुलीही आखाड्यात सराव करू लागल्या आहेत. त्यामुळे ही तालीम वेगळी ओळख निर्माण करीत आहे. अनेक पुरुष पैलवानांना घडवणारी ही माती आता महिला खेळाडुंमुळे पुढे येणार आहे. त्यामुळे याच मातीतून नामवंत महिला मल्ल लवकरच तयार होतील, अशी ग्रामस्थांना अपेक्षा आहे.
कुस्ती हा पहिल्यापासूनच पुरुषांचा खेळ म्हणून परिचित आहे. महिलांना या खेळात सहभागी होण्याची संधी फारच कमी होती. परंतु दंगलमधील गीता, बबितांचा आदर्श अनेक मुलींनी घेतला. आज अनेक मुली कुस्ती या खेळात नाव कमावण्यासाठी मेहनत करीत आहेत. शहरी भागात असणारे हे लोण आता ग्रामीण भागात पोहोचले आहे.
यातून प्रेरणा घेऊन सुर्ली गावातील अंजली संतोष वेताळ, संजना बोबडे, संजीवनी मदने, श्रावणी सतीश वेताळ या मुली येथील आखाड्यात
उतरत आहेत. त्या कुस्तीचा सराव करीत आहेत. सकाळी लवकर आवरून त्या घराबाहेर पडतात. तसेच तालमीत येऊन सराव करतात.
या सरावाला लवकरच यश येईल आणि सुर्लीसारख्या ग्रामीण भागातून दर्जेदार महिला कुस्तीपटू तयार होतील, ही आशा निर्माण झाली
आहे.
मुलींनी कुस्ती क्षेत्रात नाव कमवावे, यासाठी ग्रामस्थही त्यांना पाठिंबा देत असल्याचे दिसून येत आहे.
मुलींचा हा सराव इतर मुलींसाठी प्रेरणादायी ठरत असून, आणखीही काही मुली कुस्तीकडे आकर्षित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठीही ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत.
सराव पूर्ण झाल्यानंतर तसेच मुली कुस्तीतील सर्व डावपेच शिकल्यानंतर त्यांना स्पर्धेत उतरविले जाणार आहे. या स्पर्धांतून मुली गावाचे तसेच जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर पोहोचवतील, असा ग्रामस्थांना विश्वास आहे. कुस्ती हा खेळ फक्त पुरुषांचा नाही, हेच सध्या सुर्ली गावातील मुली दाखवून देत आहेत.