अंधश्रद्धेमुळे कोंबड्यांचा जीव ‘टांगणी’ला!
By admin | Published: February 8, 2016 10:52 PM2016-02-08T22:52:24+5:302016-02-08T23:49:08+5:30
वाई तालुक्यातील चित्र : सोमवती अमावस्येसाठी निष्पाप जीवांचा बळी
वाई : देवाच्या नावाने बळी देण्यास कायद्याने गुन्हा असताना वाई तालुक्यात मात्र आजही ही प्रथा सुरू असल्याचे सोमवारी पाहायला मिळाले. सोमवती अमावस्येनिमित्त वाई-सुरूर रस्त्यावर धरगर बुवाच्या मंदिराशेजारी देवाला बळी देण्यासाठी कोंबड्यांची विक्री सुरु होती. विक्रेत्यांनी कोंबड्यांचे पाय बांधून त्यांना रस्त्याकडेच्या झाडांना उलटे टांगले होते. देवाच्या नावाने भरलेल्या अंधश्रद्धेच्या या बाजारात कोंबड्यांचा जीव मात्र ‘टांगणी’ला लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मांढरदेव, धावजीबुवा यांच्या यात्रा काळात पशु-पक्ष्यांचे बळी दिले जाऊ नयेत, यासाठी प्रशासन जागृत असते़ यात्रा काळात बळी देण्यास पूर्णपणे बंदी असल्याने भाविक मांढरदेवीला देण्यात येणारे पशु-पक्ष्यांचे बळी हे धनगरबुवा किंवा सुरूरच्या धावजीबुवा मंदिरात देऊन नवस फेडले जातात़. यासाठी उलट्या पिसाच्या काळ्या कोंबड्यांना मागणी असते. असे प्रकार वर्षभर सुरू असल्याचे दिसून येते. अंधश्रद्धांना खतपाणी घालणारे असे प्रकार थांबवावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)