पाठबळाअभावी धोक्याची घंटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 10:53 PM2018-09-07T22:53:26+5:302018-09-07T22:53:54+5:30

Danger bother due to no support! | पाठबळाअभावी धोक्याची घंटा!

पाठबळाअभावी धोक्याची घंटा!

Next

जयदीप जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
रहिमतपूर : कºहाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेसचे नेते धैर्यशील कदम यांचे विधानसभेसाठी संधी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रहिमतपूरमध्ये येऊन जर कोणी स्वत:च्या सोयीसाठी भाजपाच्या आश्रयाला गेला तर त्याला जनता माफ करणार नाही, असे स्पष्ट सुनावले. त्यामुळे प्रदेश काँग्रेस व जिल्हा काँग्रेसच्या पाठबळाअभावी कदम यांची रणनिती काय राहणार, याकडे लक्ष लागले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रीय काँग्रेसची सत्ताधारी सरकारविरोधात जनसंघर्ष यात्रा सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील यात्रेच्या नियोजित मार्गामध्ये प्रारंभी रहिमतपूरचा समावेश नव्हता. आमदार जयकुमार गोरे व धैर्यशील कदम यांच्या प्रयत्नामुळे रहिमतपूर येथे जनसंघर्ष यात्रा आली. यावेळी रहिमतपूर नगरपरिषदेसमोर झालेल्या जाहीर सभेमध्ये धैर्यशील कदम यांनी राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या समोर ‘आम्ही कुणालाही टक्कर देऊ; परंतु प्रदेश काँग्रेस, जिल्हा काँग्रेस आमच्या पाठीशी ताकदीने उभी राहिली पाहिजे,’ असे आवाहन केले. त्यांच्या या वाक्यावरून प्रदेश काँग्रेस व जिल्हा काँग्रेस त्यांना ताकद देत नसल्याचे स्पष्ट होते. काँग्रेस पक्ष जिल्ह्यात वाढला पाहिजे, फुलला पाहिजे, यासाठी या मतदारसंघात काँग्रेसच्या विचाराचे पाच जिल्हा परिषद सदस्य काम करत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत आठ ते नऊ हजार मतांच्या फरकाने आमचा पराभव झाला आहे. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघावर बारकाईने आपण लक्ष ठेवावे. या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या विचाराचा एक आमदार तुमच्या सोबतीला महाराष्ट्रात येऊ शकतो, असा विश्वास धैर्यशील कदम यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला होता. मात्र, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये ‘भाजप सरकारला सत्तेतून घालवायचे आहे, एवढा एकच उद्देश रहिमतपूरकरांनी डोळ्यासमोर ठेवावा. स्वत:च्या सोयीसाठी जर कोणी भाजपच्या आश्रयाला गेला तर जनता व पुढची पिढी त्यांना माफ करणार नाही,’ अशा शब्दांत चव्हाण यांनी आपले मत स्पष्ट सांगितले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मार्गदर्शनात सातारा जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली पाहिजे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेमध्ये आपले उमेदवार निवडून आले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच ज्या-ज्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची जशी ताकद आहे. त्याप्रमाणे वरिष्ठ पातळीवर उमेदवारीबाबतचा निर्णय घेतले जातील, असे स्पष्ट केले. एकीकडे जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. मात्र दुसरीकडे धैर्यशील कदम यांच्यासारख्या ताकदवर उमेदवाराला पक्षाकडूनच ताकद दिली जात नाही, असेच संबंधितांच्या वक्तव्यावरून दिसून येते. सध्या काँग्रेस पक्षांमध्ये जो-तो स्वत:च्या भातावरच डाळ ओढण्याचा प्रयत्न करत असून, स्वत:चे अस्तित्व जपण्याच्या प्रयत्नात इतरांचा मात्र बळी जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कºहाड उत्तर विधानसभा मतदारसंघात धैर्यशील कदम यांनी गत निवडणुकीत ५८ हजार मते मिळवली. त्यानंतर वर्धन अ‍ॅग्रो कारखान्याची निर्मिती केली. त्याच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटून उभे राहणार आहेत. मात्र, पक्षाकडून पुरेसे पाठबळ मिळत नसल्यामुळे अस्वस्थता वाढत आहे.
वैर पक्षासाठी घातक...

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील अन् धैर्यशील कदम यांच्यात वारंवार खटके उडत आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी आनंदराव पाटील यांनी धैर्यशील कदम यांची उनी-दुनी काढल्यामुळे कदम प्रचंड संतापले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेचे कºहाड विश्रामगृहात आयोजन केले होते. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांच्या फोनमुळे धैर्यशील कदम यांनी पत्रकार परिषद रद्द केली. पृथ्वीराज चव्हाणांच्या बरोबरच्या बैठकीनंतरही आनंदराव पाटील व धैर्यशील कदम यांच्यातला तणाव निवळला नाही. त्यामुळेच जिल्हाध्यक्ष रहिमतपूर येथील जनसंघर्ष यात्रेत सहभागी झाले नाहीत. दोघांतील विळ्या भोपळ्याचे वैर काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी घातक ठरू शकते.

Web Title: Danger bother due to no support!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.