वाझोलीवर दरड कोसळण्याचा धोका, ग्रामस्थ भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 06:34 PM2021-07-28T18:34:09+5:302021-07-28T18:36:16+5:30
Flood Satara : वाझोली ता.पाटण येथे जोरदार पावसाने डोंगराला मोठ्या प्रमाणावर भगदाड पडण्यास सुरुवात झाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने या ठिकाणची पाहणी करून योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सणबूर : वाझोली ता.पाटण येथे जोरदार पावसाने डोंगराला मोठ्या प्रमाणावर भगदाड पडण्यास सुरुवात झाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने या ठिकाणची पाहणी करून योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
काळगाव विभागात वाझोली गाव व त्यामध्ये असणाऱ्या सलतेवाडी व डाकेवाडी या वाड्या डोंगरांनी व्यापलेल्या आहेत. या विभागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने येथील ग्रामस्थांना नैसर्गिक आपत्तीचा दरवर्षी सामना करावा लागतो. गत आठ दिवसापासून होणाऱ्यां अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून शेतामध्ये पाण्याचे उफाळे निघाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
वाझोली गावाअंतर्गत असणाऱ्या डाकेवाडी व सलतेवाडी या दोन्ही वाड्यांमधील व गावातील ग्रामस्थ दरड कोसळण्याच्या भीतीने ग्रामसले आहेत. चार दिवसापूर्वी झालेल्या पावसाने गावातील नळ पुरवठा करणाऱ्या पाईपलाइन तसेच नदीलगत असणाऱ्या गावविहीरीचे नुकसान झाले आहे.
सरपंच शितल लोहार, उपसरपंच सविता मोरे, अशोक मोरे, रामचंद्र चव्हाण, विजया पाटील, सुशीला मोरे, पोलीस पाटील विजय सुतार यांनी गावातील नुकसानीची पाहणी केली. तसेच दरडींबाबत प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी केली.
वाझोली गावामध्ये झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी हतबल झाले असून भात, भुईमूग शेतीचे नुकसान झाले आहे. गावातील घरांवर केव्हाही दरड कोसळेल, अशी भिती आहे. प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी
- किसन मोरे, शेतकरी