मालदननजीकचा ओढ्यावरील पूल तुटल्याने धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:44 AM2021-08-12T04:44:14+5:302021-08-12T04:44:14+5:30
ढेबेवाडी : मालदन (ता. पाटण) येथील गावाजवळच्या ओढ्यावरील फरशीपूल पुरात तुटल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. दहा दिवसांपासून पुलापलीकडील ...
ढेबेवाडी : मालदन (ता. पाटण) येथील गावाजवळच्या ओढ्यावरील फरशीपूल पुरात तुटल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. दहा दिवसांपासून पुलापलीकडील अनेक वाड्या-वस्त्यांतील नागरिकांची कसरत सुरू आहे.
मालदनच्या परिसरात मान्याचीवाडी, सुतारवाडी, टेळेवाडी, पानवळवाडी, जाधववाडी आदी अनेक वाड्यावस्त्या असून, गावाजवळच्या ओढ्यावरील फरशी पुलावरून वाड्या-वस्त्यात वाहतूक सुरू असते. तळमावले विभागातील खळे परिसरात जाणारा पर्यायी मार्गही तेथूनच गेला आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या अतिवृष्टीने आलेल्या पुरात ओढ्यावरील फरशीपुलाचा बराच भाग तुटून गेला असून, वाड्या-वस्त्यांकडील वाहतूक ठप्प झाली आहे.
बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अजूनही तेथील परस्थिती ‘जैसे थे’ असून, वाड्या-वस्त्यातील ग्रामस्थांची कसरत करतच ये-जा सुरू आहे. मालदनच्या अनेक शेतकऱ्यांची शेती नदीपलीकडे आहे. तुटलेल्या पुलावरून ये-जा करताना अनेक अडचणी येत असल्याचे सांगून तातडीने आवश्यक उपाययोजना करून गैरसोय दूर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
-------------------
पुलाची मोठी दुरवस्था झाली आहे. अर्धवट स्थितीत असलेला पूल कोणत्याही क्षणी कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते. बांधकाम विभागाने तातडीने यामध्ये लक्ष घालून दळणवळण चालू करावे.
- अधिकराव माने,
उपसरपंच, मान्याचीवाडी.
--------------------
(फोटो)
मालदन : फरशीपूल तुटल्याने वाड्या-वस्त्यातील नागरिकांची गैरसोय सुरू आहे.
-----------------------