कोरेगावचा रस्ता खचल्यामुळे धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:14 AM2021-08-02T04:14:41+5:302021-08-02T04:14:41+5:30
कोरेगाव रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून पाऊस सुरू असल्यामुळे थोरात वस्तीजवळ रस्ता अधिकच धोकादायक बनला आहे. दीड ते ...
कोरेगाव रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून पाऊस सुरू असल्यामुळे थोरात वस्तीजवळ रस्ता अधिकच धोकादायक बनला आहे. दीड ते दोन फूट अंतरापर्यंत रस्ता खचला असून रस्त्याच्या मधोमध भेग पडली आहे. रस्ता खचल्यामुळे या मार्गावरील चारचाकी वाहतूक पूर्ण बंद असून पर्यायी रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांना दुचाकीवरून प्रवास करावा लागत आहे. बांधकाम विभाग एखादी दुर्घटना घडण्याची वाट पाहतेय का, असा प्रश्न कोरेगावच्या ग्रामस्थांनी केला आहे.
कोरेगाव व कार्वे ग्रामस्थांचा या रस्त्याने धोकादायक प्रवास सुरू आहे. बारा वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे काम पूर्ण झाले होते. तत्कालीन खासदार श्रीनिवास पाटील यांनी यासाठी प्रयत्न केले होते. तेव्हापासून आजपर्यंत या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम झालेले नाही. थोरात वस्तीजवळ वळणाचा रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. यापूर्वी दोन वेळा रस्ता खचला होता. त्यावेळी ग्रामस्थांनी श्रमदान करून भराव टाकला. मात्र, वारंवार त्याच ठिकाणी रस्ता खचत आहे. एका बाजूला नदीपात्राकडे असलेला तीव्र उतार आणि दुस-या बाजूला शेतजमीन यामुळे हा रस्ता मजबूत होणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.