वन्यजीवांसह निसर्गसंपदेचे अस्तित्व धोक्यात
By admin | Published: January 23, 2016 11:58 PM2016-01-23T23:58:40+5:302016-01-23T23:58:40+5:30
मोरखिंड घाटात वणवा : पर्यावरण प्रेमींमधून नाराजी व्यक्त; विघ्नसंतोषींना आवर घालण्याची मागणी
सायगाव : मुबलक वनसंपदा आणि प्राणिसंपदा असलेल्या मोरखिंड घाटात अज्ञात व्यक्तिंकडून बुधवारी वणवा लावण्यात आला. या वणव्यात प्रचंड प्रमाणात वृक्षसंपदा नष्ट झाल्याने पर्यावरण प्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे.
मोरांचा अधिवास असलेल्या या क्षेत्रात पशुपक्ष्यांची घरटी व वन्यजीवांच्या आश्रयस्थानास वणव्यामुळे धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी या दिवसात वणवे लागत असून, यामध्ये शेकडो वनस्पती नष्ट होत आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये मोरखिंड घाटातील पर्यटकांचा ओघ प्रंचड प्रमाणात वाढला असून, गैरव्यवहारही वाढीस लागले आहे. प्रेमीयुगुलांचा बिनधास्त वावर, मद्यपींच्या ओल्या पार्ट्या, अवैद्य उत्खनन, बेसुमार वृक्षतोड या गोष्टींमुळे मोरखिंड घाट कायम चर्चेत राहिला आहे. अशातच मोरखिंड घाटात लागणारे वणवे निसर्गसंपदेच्या मुळावर उठत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
मोरांच्या अधिवास नष्ट होण्याची भीती!
मोरखिंड घाट हा जैवविविधतेने नटलेला आहे. याठिकाणी मोरांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. पर्यटकांचीही येथे नेहमीच रेलचेल असते. मात्र, या ठिकाणी गेल्या एक महिन्यापासून वणवे लागण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. वणवे लावणाऱ्या या विघ्नसंतोषी व्यक्तिंवर नियंत्रण आणने गरजेचे आहे. अन्यथा उरलीसुरली वनसंपदा व मोरांचा अधिवास नष्ट होण्याची भीती पर्यावरणप्रेमींमधून व्यक्त केली जातक आहे.