बदलत्या निसर्गचक्रामुळे मानवी जीवसृष्टीला पोहोचतोय धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:40 AM2021-05-18T04:40:08+5:302021-05-18T04:40:08+5:30
कुडाळ : वाढत्या प्रदूषणामुळे संपूर्ण जगामध्ये तापमानवृद्धी आणि त्याच्याशी निगडित हवामान यामध्ये बदल घडत आहे. याला मानवी चुकांची साथ ...
कुडाळ : वाढत्या प्रदूषणामुळे संपूर्ण जगामध्ये तापमानवृद्धी आणि त्याच्याशी निगडित हवामान यामध्ये बदल घडत आहे. याला मानवी चुकांची साथ असल्याने आज आपल्याला निसर्ग बदललेला आहे. यामुळे होणाऱ्या नैसर्गिक बदलांना सध्या सामोरे जावे लागत आहे.
पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला असून, वादळ, ढगफुटी, अवेळी पडणारा पाऊस, आदींसारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. विकासाच्या नावाखाली मानव निसर्गालाच आव्हान देत आहे. मानवाच्या या अविवेकी विचारबुद्धीमुळे निसर्गाचा समतोल ढासळताना पाहायला मिळत आहे. भरभरून देणाऱ्या या निसर्गाची आपल्या अविचाराने हानी करून आपले अस्तित्व संपवायला कारणीभूत होत आहोत.
या धरतीवर जोपर्यंत निसर्गसंपदा आहे, तोपर्यंतच सजीवसृष्टी अबाधित राहू शकते. आपल्या पूर्वजांनाही पर्यावरणाचं महत्त्व आणि रक्षण यांची जाणीव होती. आता मात्र केवळ आपल्या ऐहिक सुखासाठी आपण चालविलेला निसर्गाचा संहार सजीवसृष्टीला विनाशाकडे घेऊन चालला आहे. अमर्याद वृक्षतोड, वाढते सिमेंटचे जंगल, मोठ्या प्रमाणावर होणारी रासायनिक शेती, याचीच साक्ष देत आहे. एकीकडे तापमानात होणारी प्रचंड वाढ, अतिवृष्टी यामुळे शहरी आणि ग्रामीण जीवनाबरोबरच संपूर्ण जीवसृष्टीलाच धोका निर्माण झाला आहे. निसर्गतः निर्मित घटकांचा मानवाने आपली जीवनशैली बदलण्याच्या प्रयत्नात विनाशाकडे पाऊल टाकत आहोत. याचाच परिणाम आपण गेली कित्येक वर्षांपासून अनुभवत आहोत. वर्षभर कधीही पावसाळा तर मध्येच थंडीची लाट, कडक उष्णता अनुभवायला मिळत आहे. यामुळे निसर्गचक्र पुरते बदलले असून, सजीवसृष्टीवर याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाची मोहीम प्रभावीपणे राबवून जास्तीत जास्त अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर होणे आवश्यक आहे, तरच या भूतलावर जीवसृष्टीचे अस्तित्व अबाधित राहील. अन्यथा अतिरेकामुळे सारं काही संपुष्टात येऊन मानवजातीचा संहार घडून येईल.