पुनर्वसित गावठाणावरच डोंगर कोसळण्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:14 AM2021-08-02T04:14:43+5:302021-08-02T04:14:43+5:30
घोटील ग्रामस्थांचे ज्या ठिकाणी पुनर्वसन झाले आहे त्या ठिकाणी कृष्णा खोरे विकास महामंडळाने नागरी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. ...
घोटील ग्रामस्थांचे ज्या ठिकाणी पुनर्वसन झाले आहे त्या ठिकाणी कृष्णा खोरे विकास महामंडळाने नागरी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. नवीन पुनर्वसनाच्या ठिकाणी दळणवळणासाठी रस्ता योग्य नसल्याने ग्रामस्थांना तेथून प्रवासही करता येत नाही. गावठाणाच्या संरक्षणासाठी रस्त्याच्या बाजूची भिंत बांधण्यात आली होती. ती सध्या खचली आहे. ग्रामपंचायत स्थापनेचा विषय अजूनही प्रलंबितच आहे. ग्रामस्थांना अजूनही जमिनी मिळालेल्या नाहीत. जमीन देण्यात आली नसल्यामुळे ग्रामस्थांनी रोख रकमेची मागणी केलेली आहे. कृष्णा खोरेकडून नवीन गावठाणात सुविधा उभारणे गरजेचे आहे. मात्र, येथील ग्रामस्थांना त्या अजूनही पुरवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे उन्हाळा, पावसाळा व हिवाळा अशा तिन्ही ऋतूंमध्ये ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पुनर्वसन झाल्यापासून आजपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तशाच आहेत.
कृष्णा खोरे विकास महामंडळातील अधिकाऱ्यांकडून येथील ग्रामस्थांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पुनर्वसन नावाला सुविधा मिळेनात गावाला, अशी अवस्था सध्या पुनर्वसित घोटील ग्रामस्थांची झाली आहे. सध्या या ठिकाणी घराच्या पाठीमागून डोंगर कड्यावरून कोणत्याही क्षणी कडा कोसळेल, अशी अवस्था आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ जीव मुठीत धरून राहत आहेत.