शामगावच्या घाटात जीवाला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:27 AM2021-07-15T04:27:27+5:302021-07-15T04:27:27+5:30
शामगाव : येथील घाट अनेक समस्यांचा गर्तेत सापडला आहे. घाटातील संरक्षक कठड्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा ...
शामगाव : येथील घाट अनेक समस्यांचा गर्तेत सापडला आहे. घाटातील संरक्षक कठड्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शामगाव घाट एकेकाळी लूट, मारामारीसाठी बहुचर्चित होता. कालांतराने हे प्रमाण कमी झाले. मात्र, कठड्यांची पडझड झाल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या गंभीर बनला आहे. काही सामाजिक संघटनांनी त्यावर आवाज उठवला होता. त्यानंतर कठड्यांची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, मध्यंतरी वारंवार वाहनांच्या धडकेत कठड्यांची पुन्हा मोडतोड झाली आहे.
येळगाव विभागात मोबाईलधारक त्रस्त
कऱ्हाड : येळगाव (ता. कऱ्हाड) परिसरात सध्या वारंवार मोबाईल नेटवर्क खंडित होत असल्याने परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. येवतीसह संपूर्ण विभाग अनेकदा आऊट ऑफ कव्हरेज होत असल्याने येथील इंटरनेटद्वारे केली जाणारी अनेक कामे खोळंबत आहेत. कऱ्हाड दक्षिण विभागातील डोंगरी विभाग म्हणून येवतीसह येळगाव परिसराची ओळख आहे. या परिसरातील ग्राहकांना सध्या मोबाईल असूनही वारंवार इंटरनेट सेवा खंडित होत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. इंटरनेटअभावी बँकेतील पैसे ऑनलाईन पद्धतीने पाठविण्याची कामे करता येणे मुश्किल बनत आहे.
ग्रामीण विभागात एस.टी. सुरू करण्याची मागणी
रामापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाच्यावतीने ग्रामीण भागातील एस.टी. फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. सध्या कोरोनाची स्थिती आटोक्यात असल्यामुळे काही मार्गांवर एस.टी. पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. मात्र, ती पूर्ण क्षमतेने सुरू नाही. ग्रामीण भागात एस.टी. पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी ग्रामीण भागातील प्रवाशांतून होत आहे. पाटण ते कोयना, पाटण ते कुसरुंड, पाटण ते चाफोली, पाटण ते मणदुरे, पाटण ते सणबूर, पाटण ते ढेबेवाडी आदी मार्गावर एस.टी.च्या फेऱ्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
डोंगरपायथ्याच्या पिकांचे अतोनात नुकसान
रामापूर : पाटण तालुक्यातील डोंगरपायथ्याशी असलेल्या शेतीचे वन्यप्राण्यांकडून नुकसान केले जात आहे. रानडुक्कर, वानर, मोर, सायाळ आदी वन्य प्राण्यांकडून पिकांची नासधूस केली जात आहे. अंतर्गत मशागतीसह काही ठिकाणी पेरणीचे काम सुरू आहे. मात्र, शेतात पेरणी केल्यानंतर मोर आणि रानडुकरांकडून नुकसान केले जात आहे. अगोदरच शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. ओढ दिलेल्या पावसाने नुकतीच दमदार सुरूवात केली आहे. अशातच आता वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत असल्यामुळे शेतकरी धायकुतीला आले आहेत.