रहिमतपूर-सातारा वाहतूक ठप्प होण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:27 AM2021-07-18T04:27:42+5:302021-07-18T04:27:42+5:30

रहिमतपूर : रहिमतपूर-सातारा रस्त्याच्या ओढ्यावरील पाच पुलांची कामे सुरू असल्यामुळे वाहतुकीसाठी कमी उंचीचे व कच्च्या स्वरूपातील रस्ते तयार केले ...

Danger of Rahimatpur-Satara traffic jam | रहिमतपूर-सातारा वाहतूक ठप्प होण्याचा धोका

रहिमतपूर-सातारा वाहतूक ठप्प होण्याचा धोका

googlenewsNext

रहिमतपूर : रहिमतपूर-सातारा रस्त्याच्या ओढ्यावरील पाच पुलांची कामे सुरू असल्यामुळे वाहतुकीसाठी कमी उंचीचे व कच्च्या स्वरूपातील रस्ते तयार केले आहेत. जोरदार पावसानंतर ओढ्याला पूर आल्यास हे पर्यायी रस्ते वाहून जाऊन वाहतूक ठप्प होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

रहिमतपूर-सातारा या राज्यमार्गाच्या डांबरीकरणाचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरु आहे. अद्याप काही अंतरातील डांबरीकरणाचे काम बाकी असून, बहुतांशी ओढ्यावरील पुलाची कामे अर्धवटच राहिली आहेत. ओढ्यावरील पुलांची कामे सुरू असल्यामुळे वाहतुकीसाठी शेजारूनच पर्यायी कच्च्या स्वरूपातील रस्ते करण्यात आले आहेत. ओढ्यातील पाणी जाण्यासाठी या रस्त्यामध्ये एखादी दुसरी सिमेंटची जलवाहिनी टाकण्यात आली आहे, तसेच पर्यायी कच्च्या स्वरूपातील रस्त्याची उंची ओढ्याच्या खोलीपासून सुमारे पाच ते सहा फूट एवढीच उचलण्यात आली आहे.

पावसाळा सुरू असला, तरी अद्याप जोरदार पाऊस न झाल्यामुळे ओढ्याला पूर परिस्थिती निर्माण झालेली नाही, परंतु आगामी काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतर, या ओढ्यांना पूर आल्यास एखाद्या दुसऱ्या जलवाहिनीतून पुराचे पाणी निघून जाणे शक्य नाही, तसेच कच्च्या स्वरूपातील रस्ते पुराच्या पाण्यात टिकाव धरणे अशक्य आहे. पुराच्या पाण्याने ते लगेच वाहून जातील. पुलांची कामे सुरू असली, तरी अद्याप पुलांची कामे अर्धवट आहेत.

चौकट :

ठोस नियोजनाची गरज

दरवर्षी पावसाळ्यामध्ये रहिमतपूर-सातारा दरम्यान असलेल्या ओढ्यांना मोठ्या स्वरूपात पाण्याचे पूर येतात. पाऊस सुरू झाल्यानंतर आणि पूर परिस्थिती निर्माण होऊन कच्चे रस्ते वाहून गेल्यानंतर रहिमतपूर-सातारा वाहतूक बंद होईल. त्या परिस्थितीत पर्यायी व्यवस्था करणे अवघड असणार आहे. गतीने अर्धवट पुलाची कामे पूर्ण करावीत, अन्यथा वाहनधारक व दळणवळणाची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी रहिमतपूर-सातारा रस्त्याचे काम करणार्या ठेकेदाराला योग्य त्या सूचना देऊन गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

फोटो : १७रहिमतपूर-रोड

रहिमतपूर-सातारा रस्त्यावरील तासगाव येथे पर्यायी रस्ता एक जलवाहिनी टाकून पाच फुटांचा करण्यात आला आहे. (छाया : जयदीप जाधव)

Web Title: Danger of Rahimatpur-Satara traffic jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.