धोकादायक इमारत कोसळली !

By Admin | Published: April 19, 2017 11:02 PM2017-04-19T23:02:36+5:302017-04-19T23:02:36+5:30

कऱ्हाडात घटना : पालिका प्रशासनाने दिल्या होत्या संबंधितांना नोटिसा; शहरात ४८ धोकादायक इमारती

Dangerous building collapsed! | धोकादायक इमारत कोसळली !

धोकादायक इमारत कोसळली !

googlenewsNext



कऱ्हाड : सुमारे साठ वर्षांपूर्वी माती आणि विटांच्या साह्याने बांधण्यात आलेली जुनी इमारत पत्यांच्या पानाच्या बंगल्याप्रमाणे ढासळल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजता घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा शहरातील धोकादायक इमारतींचा विषय निर्माण झाला आहे.
शहरात आझाद चौक येथे अधिक शामराव सूर्यवंशी यांची सुमारे साठ वर्षांपूर्वीची विटा आणि माती, पत्र्यांच्या साह्याने दुमजली इमारत ही त्यांनी गजानन हणमंत देशचौगुले व उल्हास हणमंत देशचौगुले यांना मेडिकल शॉपीसाठी दोन वर्षांपूर्वी दिली होती. ही इमारत बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोसळली. विशेष म्हणजे इमारत खाली करण्यास तसेच ती पाडण्याबाबत पालिकेच्या वतीने देशचौगुले यांना १० मे रोजीच नोटीस देण्यात आली होती.
शहरात आझाद चौकात बुधवारी कोसळलेल्या इमारतीमध्ये एक मेडिकलही होते. या मेडिकलमधील साहित्याचेही नुकसान झाले. या इमारतीमधील दुकानाचे १९४७ मध्ये उद्घाटन करण्यात आले होते. माती आणि विटांच्या साह्याने बांधण्यात आलेली इमारत कोसळल्याने इमारत मालक व त्यातील दुकानमालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शहरातील या इमारत मालकाप्रमाणे इतर ४८ धोकादायक इमारत मालकांनाही पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, त्यांच्यापैकी अद्याप कोणीच इमारत खाली केलेली नाही अथवा पाडलेली नाही.
आझाद चौक हा शहरातील मुख्य बाजारपेठेतील चौक असल्यामुळे या चौकात जुन्या पद्धतीच्या अनेक इमारती आहेत. मात्र, त्याची किरकोळ डागडुजी करण्याचे काम संबंधित इमारत मालकांकडून केले जाते. सध्या या ठिकाणी असणाऱ्या अनेक जुन्या इमारती या धोकादायक स्थितीत असून, त्या पावसाळ्यापूर्वी पाडण्यात याव्यात अन्यथा जीवितहानी होईल, अशा आशयाच्या नोटिसाही पालिकेच्या वतीने वर्षानुवर्षे इमारत मालकांना दिल्या जातात. मात्र, त्याकडे फारसे कोणी लक्ष देताना दिसत नाही. (प्रतिनिधी)
पहिल्यांदा कारवाईनंतर दुर्लक्ष
शहरात एखादी धोकादायक इमारत कोसळल्यानंतर इतर धोकादायक इमारतींवर पालिकेच्या वतीने कारवाई केली जाते. मात्र, त्यात सातत्य ठेवले जात नाही. धोकादायक इमारतींप्रमाणे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करीत कारवाईचा दिखावा केला जातो. मात्र, आठ दिवस झाले की, नंतर ही कारवाई बंद केली जाते. पहिल्यांदा कारवाईचा दिखावा आणि नंतर कायमचे दुर्लक्ष हे काम पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून नियमित केले जात असल्याचे नागरिकच सांगतात.

Web Title: Dangerous building collapsed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.