रेल्वे पुलावरील कठडा बनला धोकादायक
By Admin | Published: November 16, 2014 10:29 PM2014-11-16T22:29:37+5:302014-11-16T23:48:30+5:30
अपघाताची भीती : वर्ष होऊन गेले तरी दुरुस्ती नाही
सचिन लाड - सांगली -माधवनगर रस्त्यावरील चिंतामणीनगर रेल्वे पुलावरील लोखंडी कठडा तुटल्याने अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरापासून हा कठडा तुटलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तो दुरुस्त करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. सायंकाळनंतर वाहतूक वाढलेली असते. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाहने तुटलेल्या कठड्यावरून रेल्वे रुळावर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गतवर्षी पुलावर ओव्हरटेकच्या प्रयत्नात टाटा सुमोने रिक्षाला जोराची धडक दिली होती. यामध्ये रिक्षाचालक व तीन प्रवासी असे चौघे ठार झाले होते. रिक्षाला धडक दिल्यानंतर सुमो पुलाच्या लोखंडी कठड्यावर जाऊन आदळली होती. यामध्ये कठडा निखळून पडला होता. या घटनेला वर्ष होऊन गेले तरी, कठडा दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतेच प्रयत्न केले नाहीत. कठडा असुरक्षित असल्याने त्यामुळे आता अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. ओव्हरटेक करू नये, असे फलक लावूनही पुलावर जीवघेणे ओव्हरटेक सुरूच आहेत. सायंकाळी पाच ते रात्री आठपर्यंत वाहतूक वाढलेली असते. ओव्हरटेकच्या प्रयत्नात किरकोळ अपघात होत आहेत. रात्रीच्यावेळी वाहनधारकांच्या तोंडावर समोरच्या वाहनांच्या दिव्यांचा प्रखर प्रकाश पडल्यानंतर पुढचे काहीच दिसत नाही. यातून लक्ष विचलित होऊन वाहन तुटलेल्या कठड्यावर आदळून रेल्वे रुळावर पडू शकते.
शहरामध्ये सर्वाधिक वाहतूक या रस्त्यावर होत असते. या मार्गावरील गतिरोधक नसल्यामुळे वाहने वेगाने जातात. या रस्त्यावर दुभाजक नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय या मार्गावर असल्यामुळे वाहनांची वर्दळ मार्गावर अधिक असते. रात्रीच्यावेळी वाहनधारक अपघात करुन निघून जातात. असे प्रकार अनेकदा झाले आहेत. या पुलावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशीही मागणी नागरिकांतून होत आहे.
जिल्हा पोलीस प्रमुखांना काळजी
पुलावर झालेल्या एका अपघातात चौघांचा बळी गेल्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी पुलाच्या मध्यभागी वाहतूक पोलिसांच्या मदतीने पांढरे पट्टे मारले होते. पुलाच्या दोन्ही बाजूस ‘ओव्हरटेक करू नये’, असे फलक लावले होते. या रस्त्याची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र कोणतेही प्रयत्न केले नाहीत. या रस्त्यावर दुभाजक नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावर उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय असल्यामुळे या मार्गावर वाहनांची ये जा मोठ्या प्रमाणात होत असते.