धोकादायक थांबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:44 AM2021-05-25T04:44:17+5:302021-05-25T04:44:17+5:30
शिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरच अनेक गाड्या प्रवाशांना घेण्यासाठी किंवा उतरवण्यासाठी थांबत असतात. वास्तविक पाहता महामार्गावर कोणत्याही प्रकारची वाहने ...
शिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरच अनेक गाड्या प्रवाशांना घेण्यासाठी किंवा उतरवण्यासाठी थांबत असतात. वास्तविक पाहता महामार्गावर कोणत्याही प्रकारची वाहने उभी करू नयेत, असे संकेत आहेत. तरीही खासगी वाहने उभी केली जातात. त्यामुळे महामार्गावर अपघातांना निमंत्रण मिळत आहे. ते कोठे तरी थांबविण्याची गरज आहे.
०००००
पाणपोईची गरज
दहिवडी : माण तालुक्यात सूर्यनारायण आग ओकत आहे. त्यामुळे वातावरणात उकाडा जाणवत आहे. अंगातून घामाचा धारा लागत असल्याने नागरिकांना सतत तहान लागत आहे. विविध शासकीय कामानिमित्ताने ग्रामस्थ ग्रामीण भागातून दहिवडीत येत असतात. लॉकडाऊनमुळे ते बंद असले तरी अत्यावश्यक सेवेतील नागरिकांचे हाल होत आहेत. सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन दहीवडीत पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोई सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
०००००००००
बसस्थानक ओस
सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत आहे. त्याचबरोबर उन्हाचा कडाकाही वाढत आहे. त्यामुळे नागरिक स्वत:हूनच घराबाहेर पडण्याचे टाळत असतात. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बस स्थानकांत दुपारच्या वेळी शुकशुकाट जाणवत आहे. त्याचा परिणाम एसटीच्या फेऱ्यांवरही होत असल्याचे जाणवत आहे.
००००
पाण्याची सोय करावी
सातारा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळांच्या समोर असलेल्या मैदानात कोरोनापूर्वी शोभेची झाडे, फुलझाडे लावली होती. त्यांची सेवकाकडून निगा राखली जात होती. मुले, शिक्षक पाणी घालत असत. कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे झाडेही कोमेजू लागली आहेत. पाण्याची सोय करण्याची गरज आहे.
०००००
रात्रीच्या संचारबंदीतही रस्ते गजबजलेले
सातारा : कोरोनाबाधितांची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन अनेक प्रकारे नियोजन करत आहे. रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केली आहे. यामध्ये रात्री आठनंतर कोणीही बाहेर पडणे गरजेचे नाही. त्यातून अत्यावश्यक सेवेला सवलत दिली आहे. तरीही रात्री अकरा वाजले तरी असंख्य सातारकर दुचाकीवरून फेरी मारत असतात.
०००००००००
कंटेनमेंटमुळे पोस्टमन त्रस्त
सातारा : साताऱ्यात प्रतिबंधित क्षेत्र वाढत आहे. मात्र कोणत्या इमारतीत रुग्ण आहेत, हे फारसे कळत नाही. मात्र कर्तव्य बजावण्यासाठी काही वेळेस पोस्टमनला इमारतीत जावे लागते. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र असल्यास कोरोनाचा धोका संभवतो आहे. त्यामुळे काम कसे करायचे, हे समजत नसल्याने पोस्टमन त्रस्त झाले आहेत.
-------
पाणी बचतीची गरज
सातारा : मार्च महिना संपत आला आहे, त्यामुळे उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढले असून पाणीसाठा आटत आहे. भविष्यात काही भागात पाण्याची टंचाई भासू शकते. मात्र तरीही शहरातून अजूनही खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळेच अनेक ठिकाण नळाच्या तोट्या गायब झाल्या आहेत.
०००००००
पुढील वर्गाची पुस्तके मिळेनात
सातारा : कोरोनाचा शिरकाव झालेला असल्याने कोणत्याही प्रकारची परीक्षा न घेता मुलांना पुढील वर्गात ढकलण्यात आले आहे. मात्र पुढील वर्गातील पुस्तकेच उपलब्ध नसल्याने पालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पुढील वर्गातील अभ्यास घरीच शिकवण्याची पालकांची तयारी आहे, पण पुस्तके नसल्याने पुन्हा आहे त्याच वर्गातील अभ्यासक्रम शिकविला जात आहे.
--------
वर्ये पुलावरील वाहतूक धोकादायक
सातारा : साताऱ्याकडून पुण्याकडे जात असताना साताऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या वर्ये पुलावरील लोखंडी संरक्षक गज वाकले आहेत. त्यामुळे पुलावरून जाताना वाहनचालकाचा ताबा सुटल्यास वाहन सरळ खाली जाऊ शकते. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या पुलाची दुुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.