उत्तरमांड प्रकल्पानजीक धोकादायक वळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:40 AM2021-01-13T05:40:56+5:302021-01-13T05:40:56+5:30
उत्तरमांड मध्यम प्रकल्पात सध्या ५.८९ टीएमसी पाणीसाठा झाला असून जलाशयाला विशाल स्वरूप प्राप्त झाले आहे. जलाशयातील पाणीसाठा पाहण्यासाठी पर्यटक, ...
उत्तरमांड मध्यम प्रकल्पात सध्या ५.८९ टीएमसी पाणीसाठा झाला असून जलाशयाला विशाल स्वरूप प्राप्त झाले आहे. जलाशयातील पाणीसाठा पाहण्यासाठी पर्यटक, भाविक गर्दी करू लागले आहेत. चाफळ विभागात जाताना उत्तरमांड मध्यम प्रकल्पाच्या जवळ असलेल्या रस्त्यानेच जावे लागते. रस्त्याच्या बाजूने संरक्षक तटबंदी असणे गरजेचे असतानाही याकडे संबंधितानी दुर्लक्ष केले आहे. विभागात जाणारा हा मुख्य रस्ता असून, या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. प्रकल्पाचे पहिलेच वळण धोकादायक असल्यामुळे या वळणावरून वाहने धरणाच्या पात्रात जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा बेसुमार झाडी वाढल्याने समोरुन येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे हे वळण अपघाताचे ठिकाण बनले आहे. केवळ धरणाच्या बाजूने कृष्णा खोरे महामंडळाने संरक्षक कठडे अथवा तटबंदी न केल्यामुळेच हे धोकादायक वळण अपघाताला आमंत्रण देत आहे.