पैसे वाचविण्यासाठी कापड आणि निकृष्ट पॅडचा वापर धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:28 AM2021-05-28T04:28:13+5:302021-05-28T04:28:13+5:30

जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन प्रगती जाधव-पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मासिक पाळी ही प्रत्येक स्त्रीची सामान्य व ...

Dangerous use of cloth and inferior pads to save money | पैसे वाचविण्यासाठी कापड आणि निकृष्ट पॅडचा वापर धोकादायक

पैसे वाचविण्यासाठी कापड आणि निकृष्ट पॅडचा वापर धोकादायक

googlenewsNext

जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन

प्रगती जाधव-पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : मासिक पाळी ही प्रत्येक स्त्रीची सामान्य व नैसर्गिक शरीरक्रिया आहे. शरिरातील इतर अवयवांसारखं हेही प्रजनन अवयवांचं काम आहे. ग्लोबल झालेल्या या युगातही दुर्दैवाने हा विषय कुटुंबांमध्ये अद्यापही अचर्चित राहतोय. या दिवसांत वापरण्यात येणारे कापड स्वच्छ न कल्यास किंवा पॅड वेळेत न बदलल्यास होणारे दुष्परिणाम अधिक आहेत. त्यामुळे मेन्स्ट्रयुअल कप हा सर्वाेत्तम पर्याय असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

मासिक पाळी अशुभ किंवा वाईट समजणं चुकीचं आहे. याविषयी समाजात जागरूकता निर्माण होण्यासाठी २८ मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन पाळला जातो. सुमारे ८ कोटी स्त्रिया आणि मुलींना रोज पाळी येते, त्यातील बऱ्याच जणींमध्ये पाळीविषयी बरेच समज-गैरसमज आहेत. पाळी येणं अपशकुन नसून, तो शुध्दीकरणाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. याबाबत प्रबोधन होत नसल्याने या दिवसात अनेक सण-समारंभांपासूनही महिलांना वंचित ठेवले जाते. बऱ्याच स्त्रिया या दिवसांत स्वस्त असलेलं कापड, घराबाहेर पडायचं असेल तर परवडेल असं पॅड वापरतात.

जागतिक पातळीवर घेतलेल्या सर्वेक्षणानुसार कापड स्वच्छ न धुतल्याने त्यात जंतूसंसर्ग होण्याचा धोका असतो. तर सहा तासांच्या फरकाने पॅड बदललं नाही तर पॅडमध्ये असलेले जेल आणि रक्तस्त्राव यांची क्रिया होऊन योनी मार्गाचा संसर्ग संभवतो. त्यामुळे मेन्स्ट्रयुअल कप वापरणं आरोग्याच्यादृष्टीने उपयुक्त असल्याचे तज्ज्ञ मानतात.

चौकट :

वयोमानाबरोबरच वजनामध्ये बदल झाला किंवा शरिरात काही रासायनिक बदल झाल्यास पाळीवर त्याचा परिणाम होतो. साधारणपणे वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षापर्यंत पाळी सुरु होते. दहाव्या वर्षी येणाऱ्या पाळीला ‘प्रिकॉशियस प्युबर्टी’ तर सोळा वर्षांनतर येणाऱ्या पाळीला ‘डिलेड प्युबर्टी’ असे म्हणतात. वयाच्या ४७ वर्षापर्यंत पाळी जाते त्याला ‘मेनोपॉज’ म्हणतात. पाळी ५० वर्षे वयापर्यंत गेली तर त्याला ‘डिलेड मेनोप़ॉज’ म्हणतात. दहा वर्षांच्या आधी येणारी आणि ५० वर्षे वयापर्यंत न गेलेल्या पाळीबाबत डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.

मासिक पाळीमध्ये कोणत्या खबरदारी घ्याव्यात

- कापड न वापरता पॅड किंवा मेन्स्ट्रयुअल कपचा वापर करावा.

- रक्तस्त्राव कितीही कमी असला तरीही दर सहा तासांनी पॅड बदलावे.

- वापरलेले पॅड नीट पेपरमध्ये गुंडाळून बंद कचरापेटीत टाकावे.

- या दिवसात योनीमार्ग स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणारे केमिकल टाळावे.

- पुरेशी विश्रांती आणि झोप घ्यावी.

- मीठ, साखर, कॉफी, दारु, तिखट पदार्थ शक्यतो टाळावे.

- मुबलक प्रमाणात पाणी, फळे, पालेभाज्या, आलं, हळद, बदाम, काजू तसेच प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन करावे.

कोट :

मासिक पाळीबाबत ग्रामीण भागासह शहरातही मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहेत. योनी मार्गाचा संसर्ग हा मासिक पाळीतील अस्वच्छतेचा परिणाम आहे. त्यामुळे पॅडचे पैसे वाचवून आरोग्य धोक्यात घालणं महिलांनी टाळायला हवं.

- डॉ. आदिती जाधव, स्त्रीरोगतज्ज्ञ, सनराईज हॉस्पिटल, सातारा

Web Title: Dangerous use of cloth and inferior pads to save money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.