धोकादायक विहिरींमुळे अपघाताला निमंत्रण, वाघेरीतील स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 06:15 PM2020-11-30T18:15:08+5:302020-11-30T18:17:44+5:30
road, accident, sataranews पुसेसावळी रस्ता ते बोरजाईमळा वाघेरी रस्ता अत्यंत खराब झाला असून, या रस्त्यानजीक असलेल्या आणि झाडाझुडपांनी वेढलेल्या विहिरीमुळे धोका निर्माण होत आहे. कोणताही संरक्षक कठडा नसलेल्या आणि धोक्याची सूचना देणारा फलक नसलेल्या या विहिरीमुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे.
ओगलेवाडी : पुसेसावळी रस्ता ते बोरजाईमळा वाघेरी रस्ता अत्यंत खराब झाला असून, या रस्त्यानजीक असलेल्या आणि झाडाझुडपांनी वेढलेल्या विहिरीमुळे धोका निर्माण होत आहे. कोणताही संरक्षक कठडा नसलेल्या आणि धोक्याची सूचना देणारा फलक नसलेल्या या विहिरीमुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे.
कऱ्हाड तालुक्यातील वाघेरी हे पूर्वेकडील कमी पावसाच्या विभागातील गाव आहे. सध्या कालव्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर ऊस शेती केली जाते. या गावाला दोन रस्ते आहे. हे रस्ते कऱ्हाड ते पुसेसावळी या राज्यमार्गाला जोडले गेले आहेत. रस्त्याकडेला अनेक विहिरी आहेत. त्यापैकी पाच विहिरी तर रस्त्याला लागून आहेत. भागात मोठ्या प्रमाणावर ऊस शेती केली जात आहे.
सध्या ऊसतोडणी हंगाम जोरात चालू आहे. या भागातील ऊस सह्याद्रीबरोबरच डोंगराई, वर्धन आणि जयवंत शुगर या कारखान्याला पुरवला जातो. ऊस घेऊन जाणारी वाहनेही याच रस्त्याचा वापर करतात. तसेच या परिसरातील वाघेरी, मेरवेवाडी आणि इतर गावांतील ग्रामस्थही याच रस्त्याचा वापर करतात.
बोरजाईमळा चौकापासून काही अंतरावर असणाऱ्या या विहिरी रस्त्याच्या वाहतुकीला अडचणी बनत आहेत. दोन ट्रॉली घेऊन जाणारे ट्रॅक्टर तर या रस्त्यावर चालवणे म्हणजे जीवावरचे काम आहे. त्यातच या विहिरी झाडाझुडपांत लपलेल्या असल्याने येथे विहीर असेल, अशी कल्पनाही येत नाही.
... तर वडोलीच्या घटनेची पुनरावृत्ती
गत महिन्यात वडोली निळेश्वर येथे रस्त्यानजीक असलेल्या विहिरीत उसाने भरलेल्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर कोसळून चालक जागीच ठार झाला होता. तशीच धोकादायक परिस्थिती सध्या वाघेरीत आहे. वडोली निळेश्वरच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी वेळीच दखल घेऊन येथे संरक्षक कठडा बांधण्याची मागणी केली जात आहे.
वाघेरीतील विहिरी झाडाझुडपांत लपलेल्या असल्याने अपघात होण्याची शक्यता वाढत आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असल्याने वाहन चालवण्यासाठी अडचणी निर्माण होतात. मोठ्या अपघातापूर्वी हा रस्ता तत्काळ दुरुस्त करावा. विहिरींबाबतही योग्य ती कार्यवाही करावी.
- हाजी बाळ सरदार पटेल,
ग्रामस्थ, वाघेरी