झकास आगाशिव वणव्यामुळे भकास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 07:22 PM2018-02-04T19:22:56+5:302018-02-04T19:22:56+5:30

Dangers of Agashiv! | झकास आगाशिव वणव्यामुळे भकास!

झकास आगाशिव वणव्यामुळे भकास!

Next

लाखोंची वनसंपदा खाक : अज्ञातांनी लावली आग; वनविभागाच्या प्रयत्नानंतर वणवा आटोक्यात
मलकापूर : एका बाजूला पर्यावरण संवर्धनासाठी अनेक पर्याय करत असताना येथील आगाशिव डोंगर परिसरात रात्रीच्यावेळी वणवे पेटत असल्याने आगाशिव पर्यटनस्थळाला समाजकंटकांचे ग्रहण लागले आहे. आगाशिव डोंगरात शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत लाखोंची वनसंपदा जळून खाक झाली.
जागतिक पातळीवर पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रमांतून अनेक पर्याय करण्यावर भर दिला जात आहे. शासन कोट्यवधींची तरतूद करून वनसंपदा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. अनेक ठिकाणे पर्यटनस्थळ म्हणून घोषित केली जात आहेत. तर वनविभागाकडून अनेक ठिकाणी वनसंपदा रक्षणासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आगाशिव डोंगर परिसर महाराष्ट्र शासनाने पर्यटनस्थळ म्हणून घोषित केला आहे. या पर्यटनस्थळ विकासासाठी शासनाने सुमारे ४५ कोटींचा विकास आराखडाही तयार केला आहे. त्यापैकी पहिल्या हप्त्यातील पाच कोटी निधीतून डोंगराला कुंपण, वनतळी, बंधारे व वृक्षारोपण करण्यात आले आहे.
वनविभागाकडून टँकरने पाणीपुरवठा करून हजारो झाडे वाढवली आहेत. वनविभागाबरोबरच गेली अनेक वर्षांपासून मळाईदेवी शिक्षणसंस्था व जखिणवाडी ग्रामपंचायतीने आगाशिव डोंगर परिसरात वृक्षारोपण व बिजारोपण करून या परिसराला वेगळे रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. झपाट्याने पर्यटनस्थळ विकसित होत असताना गेल्या चार दिवसांत ठिकठिकाणी समाजकंटकांकडून रात्रीच्यावेळी वणवे पेटवले जात आहेत. अशा समाजकंटकांचे आगाशिव पर्यटनस्थळाला चांगलेच ग्रहण लागले आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी वनविभागाकडून कठोर उपाययोजनाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
तीन हेक्टर भक्ष्यस्थानी
आगाशिव डोंगरात लागलेल्या वणव्यात सुमारे तीन हेक्टर क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. या क्षेत्रातील वनसंपदा जळून खाक झाली आहे. मात्र वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी आग विझवण्यासाठी ओल्या झाडांच्या फांद्याने व इतर अथक प्रयत्न करून उर्वरित शेकडो एक्कर क्षेत्र आगीपासून वाचवण्यात यश मिळाले आहे.
‘मॉर्निंग वॉक’वाल्यांच्या डोळ्यात पाणी
आगाशिव डोंगर पर्यटनस्थळ घोषित झाल्यानंतर भरपूर वृक्षारोपण झाले. डोंगर हिरवा दिसू लागला. डोंगरावर चढउतार करण्यासाठी पायºयांची निर्मिती केली आहे. त्यामुळे आबालवृद्धांसह शेकडो तरुण मॉर्निंग वॉकला आगाशिव डोंगरावर जातात. दुष्काळ परिस्थिती व उन्हाळ्यात डोंगरावरील झाडे कोमेजतात. अशावेळी मलकापुरातील तरुणांनी मॉर्निंग वॉकला जाताना झेपेल एवढ्या कॅनमधून पाणी नेऊन अनेक झाडे जगवली होती. ती झाडे डोंगराला लागलेल्या वणव्यात जळाल्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आले.

 

 

Web Title: Dangers of Agashiv!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.