‘पंचाईत’ होताच सुचले अधिकाऱ्यांना शहाणपण !
By admin | Published: March 3, 2015 10:00 PM2015-03-03T22:00:17+5:302015-03-03T22:44:29+5:30
तक्रारपेटी जाग्यावर : कऱ्हाड पंचायत समितीत मनमानीला चाप--लोकमतचा दणका
कऱ्हाड : एखाद्या विकास कामाबद्दल किंवा प्रशासकीय अडचणीबद्दल तक्रार करण्यासाठी येथील पंचायत समितीत ‘तक्रारपेटी’ होती. मात्र, अचानकपणे ती पेटी गायब झाली. ज्यावेळी हा प्रकार उघडकीस आला त्यावेळी अधिकाऱ्यांनी ‘कानावर हात’ ठेवले. आम्हाला माहितच नाही, असा पवित्रा घेत अधिकाऱ्यांनी स्वत:ची कातडी वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘लोकमत’ने अधिकाऱ्यांच्या साळसुदपणाचा पर्दाफाश करीत गायब झालेल्या तक्रारपेटीचा पाठपुरावा केला असता अधिकाऱ्यांची चांगलीच ‘पंचाईत’ झाली. उशिरा का होईना त्यांना शहाणपण सुचलं. भंगारात घातलेली तक्रारपेटी पुन्हा मुळ जाग्यावर आली.
येथील पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांची मनमानी तशी नविन नाही. अधिकाऱ्यांच्या ‘हम करे सो कायदा’ या वृत्तीचे सामान्यांना वारंवार दर्शनही घडते; पण याबाबत तक्रार करायची कुणाकडे, हाही प्रश्न आहे. त्यामुळेच सामान्यांना अक्षरश: तोंड दाबुन बुक्यांचा मार सहन करावा लागतो. अधिकाऱ्यांच्या या मनमानीबाबत किंवा एखाद्या विकास कामांतील त्रुटीबाबत गोपनीयरीत्या तक्रार करण्यासाठी पंचायत समितीत तक्रारपेटी असायची. कुलूपबंद असलेल्या या तक्रारपेटीत सामान्यांना त्यांच्या तक्रारी लेखी स्वरूपात टाकता येत होत्या. तक्रारपेटीद्वारे दिलेली तक्रार पुढे वरीष्ठ अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांपर्यंतही पोहोचायची; पण हे अवघड जागचं दुखणं कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनीच नामी शक्कल लढवली. सुमारे दोन महिन्यांपुर्वी अचानकपणे ती तक्रारपेटी पंचायत समितीमधून गायब करण्यात आली. सुरूवातीला हा प्रकार कोणाच्या निदर्शनास आला नाही. त्यामुळे अधिकारीही हे गुपित झाकल्या मुठीत असल्याच्या अविर्भावात वावरत होते. अखेर हा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला.
‘तक्रारी संपल्या की पेटी हरवली ?’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले. त्यावेळी पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकारीही खडबडून जागे झाले. तक्रारपेटीबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा होऊ लागली. मात्र, तरीही अधिकारी ‘ताकास तूर’ लागू देत नव्हते. कुलूप गंजल्याने पेटी काढली असल्याचे गुळमुळीत उत्तर देऊन अधिकाऱ्यांनी कातडी वाचविण्यास सुरूवात केली. ‘म्हणे, आम्हीच काढली तक्रार पेटी’ या मथळ्याखाली पुन्हा वृत्त प्रसिद्ध करून लोकमतने अधिकाऱ्यांच्या साळसुदपणाचा बुरखा फाडला.
‘लोकमत’ने ‘तक्रारपेटी निवांत बसवा, सदस्यांचा तक्रारी तरी मिटवा’ या मथळ्याखाली या प्रकारावर सडेतोड भाष्य केले. त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. (प्रतिनिधी)
तक्रारपेटी भंगाराच्या खोलीत
पंचायत समितीमधून काढून ठेवलेली जुनी तक्रारपेटी एका जबाबदार विभागाने भंगाराच्या खोलीत टाकल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहामध्ये असलेल्या भंगाराच्या खोलीत ती तक्रारपेटी टाकण्यात आली होती. त्याठिकाणी खासगीत त्या पेटीवर ‘उपचार’ केले जात होते म्हणे; पण आता नव्या रंगात अन् नव्या कु लूपासह ही तक्रारपेटी पंचायत समितीत आली आहे.