राष्ट्रवादीच्या विरोधकांचा डांगोराच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 10:45 PM2019-03-17T22:45:27+5:302019-03-17T22:45:32+5:30
नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना ठाम विरोधक ठरणाऱ्या ...
नितीन काळेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना ठाम विरोधक ठरणाऱ्या युतीतील शिवसेना आणि भाजपचे नेते मतदारसंघ आमच्याकडेच राहणार म्हणून सांगत असल्यानेच उमेदवारीचा निर्णय लांबणीवर पडत आहे. त्यातच आधी मतदारसंघ कोणाकडे जाईल, यावर बैठक होणार असून, त्यानंतरच युतीतील संबंधित पक्ष उमेदवाराचे नाव जाहीर करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. यामुळे मतदारसंघ आमच्याकडेच राहणार म्हणण्याचा दावा कोणासाठी खरा ठरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सातारा मतदारसंघ अनेक वर्षांपासून युतीत शिवसेनेच्या वाट्याला आहे. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर २००९ लाही सेनेने येथून निवडणूक लढविली. तर मागीलवेळी २०१४ ला शिवसेनेच्या कोट्यातून महायुतीतील ‘रिपाइं’ला मतदारसंघ मिळाला; पण सध्या ‘रिपाइं’ भाजपबरोबर आहे. त्यामुळे दहा वर्षांनंतर सेना साताऱ्यातून निवडणूक लढण्यास तयार आहे. मात्र, भाजपही मतदारसंघ आमच्याकडे राहणार म्हणून पूर्ण तयारीने निवडणुकीत उतरली आहे.
सातारा मतदार संघाचा विचार करता शिवसेनेच्या तुलनेत भाजपची ताकद निश्चितच जास्त आहे. या बळावरच भाजपने सेनेपेक्षा आधीपासूनच सातारा मतदारसंघ लढविण्याची तयारी केली होती. तर युती झाल्यापासून शिवसेना रणांगणात खºया अर्थाने उतरली. भाजपकडून जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर इच्छुक आहेत; पण भाजपमध्ये आलेले माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी तर मतदारसंघ पिंजून काढला. दररोज त्यांच्या बैठका, गाठीभेटी होत आहेत. त्या तुलनेत शिवसेना मागे राहिली. कारण, सेनेत तीन-चारजण इच्छुक होते. आतातर भाजपमध्ये असणारे पुरुषोत्तम जाधव यांनी शिवबंधन बांधले आहे. पाच वर्षांनंतर त्यांची घरवापसी झाली आहे. घरवापसी सेनेची उमेदवारी मिळणार म्हणूनच आहे. तर युतीचा मीच उमेदवार, अशा पद्धतीनेच त्यांनी तीन वर्षांपासून मतदार संघात भेटी-गाठी सुरू केलेल्या. तर भाजपचे इच्छुक नरेंद्र पाटील हे मुंबईतील हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. हे दोघेही राष्ट्रवादीसाठी डोईजड आहेत.
सेना-भाजपही निष्ठावंतांसाठी आग्रही
युतीच्या घोषणेनंतर शिवसेनेने खºया अर्थाने निवडणुकीची तयारी केली. त्यापूर्वी फक्त निवडणूक लढविणार, असे सांगितले जात होते. साताºयात सेनेची बैठक झाली. त्यावेळी मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार असल्याचे सांगत निष्ठावंत शिवसैनिकाला उमेदवारी मिळावी, अशी मागणी झाली तर भाजपनेही बैठकीत निष्ठावंतांना उमेदवारी मिळावी म्हणून जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नावाचा ठराव केलेला.
उदयनराजेंविरोधात जाधव तिसऱ्यांदा..
खंडाळा तालुक्यातील पुरुषोत्तम जाधव यांची राजकीय महत्त्वाकांक्षा कधीच लपून राहिलेली नाही. निवडणुकीत पराभूत होऊनही ते मतदारसंघात फिरतच असतात. आता शिवसेनेकडे मतदारसंघ राहिल्यास जाधव यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे झाल्यास जाधव आणि खासदार उदयनराजे भोसले हे तिसºयांदा निवडणुकीत समोरासमोर येणार आहेत.