फलटण तालुक्यात डेंग्यूूूचे पुन्हा डोके वर, मुंजवाडीत साथ : आठ रुग्णांवर उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 18:21 IST2017-11-20T18:18:34+5:302017-11-20T18:21:47+5:30
फलटण तालुक्यातील मुंजवडी गावात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांत आठ ते दहा जणांना डेंग्यूची लागण झाली असून, सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी फलटण येथील एका युवकाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने नागरिकांनी या आजाराची धास्ती घेतली आहे.

फलटण तालुक्यात डेंग्यूूूचे पुन्हा डोके वर, मुंजवाडीत साथ : आठ रुग्णांवर उपचार सुरू
फलटण : फलटण तालुक्यातील मुंजवडी गावात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांत आठ ते दहा जणांना डेंग्यूची लागण झाली असून, सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी फलटण येथील एका युवकाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने नागरिकांनी या आजाराची धास्ती घेतली आहे.
फलटण तालुक्यातील पूर्व भागात महिन्यापासून डेंग्यू व इतर आजारांच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. उलट्या, जुलाब, तापासह मलेरियाने ग्रस्त रुग्णांचाही यात समावेश आहे.
मुंजवडी गावात सध्या अनेक रुग्ण ताप, सर्दी, खोकला या आजारांनी ग्रासले आहे. अनेक रुग्ण बरड येथील सरकारी व फलटण येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
आतापर्यंत आठ ते दहा जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. असे असूनही शासकीय यंत्रणा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांनी आजारांविषयी फलक, पत्रके, दवंडी, सूचना, जनजागृती, औषध फवारणीसारखी कोणतीही उपाययोजना केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.
फलटण तालुक्यात आजपर्यंत तीन नागरिकांना डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे या आजाराची नागरिकांची धास्ती घेतली आहे. या आजारांवर प्र्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.