संगम माहुलीत तीर्थक्षेत्र विकास पॅनेलचा डंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:37 AM2021-01-20T04:37:23+5:302021-01-20T04:37:23+5:30
सातारा : सातारा तालुक्यातील संगम माहुली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तीर्थक्षेत्र संगम माहुली विकास पॅनेलने ९ पैकी ५ जागांवर दणदणीत विजय ...
सातारा : सातारा तालुक्यातील संगम माहुली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तीर्थक्षेत्र संगम माहुली विकास पॅनेलने ९ पैकी ५ जागांवर दणदणीत विजय मिळविला आहे.
खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने स्वच्छ सुंदर संगम माहुली, स्वप्न नव्हे ध्येय हा विचार घेऊन निवडणूक लढवित असताना प्रवीण शिंदे, अविनाश कोळपे, प्रकाश माने, हेमलता पडवळ, साधना सावंत हे सदस्य निवडून आले, याचबरोबर त्यांना संगम माहुली ग्रामस्थांनी खंबीर साथ देत विजयात निर्णायक कामगिरी बजावली आहे.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे म्हणाले, ‘केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेची माहिती ग्रामस्थांना देऊन संगम माहुली आत्मनिर्भर करण्यासाठी काम करणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य, शिक्षण व सर्व मूलभूत सुविधा प्राप्त करून देण्यासाठी सतत कार्यरत राहणार असून, गावात पेयजल योजना, डिजिटल गाव आणि वाचनालय, स्मशानभूमीसाठी पार्किंग, महिला बचतगट सक्षमीकरण, पथदीप, ग्रामपंचायत आणि मागास वस्तीमध्ये हायमॅक्स, उर्वरित बंदिस्त गटार योजना, बागबगीचा आणि नानानानी पार्क, सीसीटीव्ही, कचरा व्यवस्थापनसाठी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या घंटागाड्या, मागासवर्गीयांसाठी समाजमंदिर ही कामे पूर्ण करणार आहे. त्यासाठी गावाच्या विकास कार्यात अधिकाधिक युवकांना सामावून घेणार आहे, असेही राहुल शिवनामे यांनी सांगितले.
कोट
आगामी काळात गावाच्या विकासासाठी झोकून देऊन कार्य करणार आहे. संगम माहुली तीर्थक्षेत्र पर्यटन विकासासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकारच्या रस्ते विकासाच्या योजना प्रभावीपणे आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
- राहुल शिवनामे, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा