कातरखटावात सामाजिक सलोख्याचे दर्शन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2016 10:50 PM2016-10-07T22:50:06+5:302016-10-07T23:52:44+5:30
दोन गटांत धुमश्चक्री : प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर चोवीस तासांत तणाव निवळला
कातरखटाव : कातरखटावातील दोन गटांमध्ये झालेल्या जोरदार धुमश्चक्रीनंतर निर्माण झालेला तणाव अखेर सामाजिक सलोख्यातून मिटला. दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध दिलेल्या तक्रारी गैरसमजातून असल्याचे लेखी पत्र पोलिसांना सुपूर्त केले. त्यामुळे तीनशे जणांविरुद्ध दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. याबाबत माहिती अशी की, कातरखटावमध्ये गेल्या काही दिवसांपासून दोन गटांमध्ये धुसफूस सुरू होती. अधूनमधून भांडणेही होत होती. गावातीलच काही प्रतिष्ठित मंडळींनी दोन्ही गटांतील युवकांची समजूत काढून हा वाद मिटविला होता. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा वाद विकोपाला गेला. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कातरखटाव ग्रामपंचायत कार्यालयात उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत काळे, पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. दरम्यान, एका गटाने चर्चेसाठी बाहेरगावच्या व्यक्तीला बोलविल्याने दुसरा गट चिडला. त्यातून तणाव आणखी वाढला. अंधारात जमावाने बाहेरून आलेली जीप (एमएच ११ एडब्ल्यू ६०३२) उलटून टाकली.तणावपूर्ण वातावरण तयार झाल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढविला. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सीमा होळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी काळे, पोलिस निरीक्षक शिर्के यांनी रात्री घटनास्थळी जाऊन शांतता राखण्याचे आवाहन केले. यावेळी अधिकाऱ्यांसमोर काहींनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. रात्री उशिरापर्यंत प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थांमध्ये वादावादी सुरू होती. शुक्रवारी दिवसभरही गावात वातावरण तंगच होते. दरम्यान, सायंकाळी प्रशासनाने बोलविलेल्या बैठकीत शांततेचे आवाहन करण्यात आल्यानंतर वातावरण निवळले. मात्र, तरीही
पोलिसांचा फौजफाटा गावात ठेवण्यात आलेला आहे. दरम्यान, शनिवारचा तालुका बंद मागे घेण्यात आला आहे. (वार्ताहर)
पोलिस ठाण्यात जमाव
शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास वडूज पोलिस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता. घटनेची माहिती समजताच पंचक्रोशीतील तरुण गोळा होऊ लागले. त्यामुळे पुसेगाव, औंध, दहिवडी आणि मायणी येथील पोलिसांची जादा कुमक तातडीने मागविण्यात आली. दरम्यान, आमदार प्रभाकर घार्गे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, अशोक गोडसे, नंदकुमार गोडसे, नंदकुमार मोरे आदींनी तहसील कार्यालयात ग्रामस्थांशी चर्चा करून शांतता राखण्याचे आवाहन केले.