आकडेवाले उजेडात बिल भरणारे अंधारात!, खर्चाचा बोजा ग्राहकांनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 11:59 AM2020-06-11T11:59:43+5:302020-06-11T12:04:11+5:30
फलटण पश्चिम भागात वीजवितरण कंपनी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व कर्मचाऱ्याच्या आशीर्वादाने बडे उद्योगपती आकडे टाकून वीज वापरत आहेत, तर सर्वसामान्य वीजग्राहक वेळेत वीजबिलभरूनही वीज मिळत नसल्याने अंधारात चाचपडावे लागत आहे. त्यामुळे आकडे टाकणारे उजेडात अन् वेळेत वीजबिल भरणारे अंधारात असे चित्र आदर्की परिसरात दिसत आहे.
आदर्की : फलटण पश्चिम भागात वीजवितरण कंपनी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व कर्मचाऱ्याच्या आशीर्वादाने बडे उद्योगपती आकडे टाकून वीज वापरत आहेत, तर सर्वसामान्य वीजग्राहक वेळेत वीजबिलभरूनही वीज मिळत नसल्याने अंधारात चाचपडावे लागत आहे. त्यामुळे आकडे टाकणारे उजेडात अन् वेळेत वीजबिल भरणारे अंधारात असे चित्र आदर्की परिसरात दिसत आहे.
फलटण पश्चिम भागात धोम-बलकवडी उजव्या कालव्यातून पाणी दुष्काळी भागात आले. त्यामुळे बागायती क्षेत्र वाढल्याने विजेची मागणी वाढली. त्या प्रमाणात ट्रान्सफॉर्मर संख्या वाढली नाही. मात्र, वीजवितरण कंपनी कृषीपंपाना ट्रान्सफॉर्मरच्या क्षमतेपेक्षा जादा वीज जोडणी दिली. त्यामुळे फ्यूज तुटणे, केबल जळणे, डी.ओ. जाणे, ट्रान्सफॉर्मर फेल होणे, असे प्रकार वांरवार घडू लागले आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांना वर्गणी काढून केबल, फ्यूज बदलावे लागतात. त्यांना बिलही भरावे लागते.
पाण्यामुळे छोटे-उद्योग व्यवसाय वाढला आहे. शेतकरी बिल भरूनही वीजपुरवठा वांरवार खंडित होत असल्याने पिके वाळून जात आहेत. काहीजण विहिरीवर फक्त कृषिपंप, पाईपलाईन करतात; पण वीज चोरून आकडे टाकून घेतात. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरवर विजेचा लोड येऊन वीजपुरवठा वांरवार खंडित होतो. केबल, फ्यूज, ट्रान्सफॉर्मर निकामी होतो. त्याचा खर्च नियमित वीज ग्राहकांना करावा लागतो. त्याबरोबर काही ठिकाणी गावठाण सिंगल फेज विद्युत वाहिनी गेली नाही त्या गाव, वाडी-वस्तीवर थ्रीफेज विद्युत वाहिनी गेली आहे. त्या वाहिनीच्या माध्यमातून घरगुती वीजपुरवठा दिला आहे.
ते ग्राहक प्रत्येक महिन्याला वीजबिल भरत असतात; पण आकडे टाकून वीज वापरतात त्यांच्यामुळे बिल भरणारे अंधारात राहतात, तरीही अधिकारी दुर्लक्ष करतात तर वायरमन गांधारीची भूमिका घेऊन आकडे टाकणाºयांचे पाठराखण करतात. त्यामुळे नियमित वीजबिल भरणारे अंधारात अन् आकडे टाकणारे उजेडात, अशी परिस्थिती आदर्की परिसरात दिसत आहे.
कापशीच्या नव्या फिडरवरून वीजपुरवठा
फलटण पश्चिम भागात १९६४ च्या दरम्यान सातारारोड फिडरवरून वीजपुरवठा होत होता. त्यानंतर १९९५ पासून लोणंद फिडरवरून वीजपुरवठा सुरू झाला. त्यानंतर कापशी येथे नव्याने फिडर उभारून आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक कापशी, आळजापूर, बिबी, घाडगेवाडी, मुळीकवाडी, कोराळे, वाघोशी, वडगाव, पिराचीवाडी गाव, वाड्या, वस्त्यांना वीज पुरवठा होतो.