चाफळ विभागातील वाड्यावस्त्या अंधारात...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:25 AM2021-06-29T04:25:44+5:302021-06-29T04:25:44+5:30
चाफळ : पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील सर्व गावे वाड्यावस्त्यांचे वीज कनेक्शन वीजवितरण कंपनीने बंद केल्याने संपूर्ण चाफळ विभाग अंधारात ...
चाफळ : पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील सर्व गावे वाड्यावस्त्यांचे वीज कनेक्शन वीजवितरण कंपनीने बंद केल्याने संपूर्ण चाफळ विभाग अंधारात लोटला गेला आहे. गावच्या विहिरीत पाणी असूनदेखील ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करता येईना. परिणामी ऐन पावसाळ्यात कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ‘सहनही होईना व सांगताही येईना’ अशी काहीशी नागरिकांची अवस्था झाली आहे.
शासनाने वीजवितरण कंपनीशी चर्चा करून यावर तोडगा काढावा व वीजबिल माफ करावे, अशी मागणी सर्व गावच्या सरपंचांसह ग्रामस्थांनी केली आहे. दुर्गम डोंगदऱ्याखोऱ्यात विखुरलेल्या चाफळ विभागात एकूण २२ ग्रामपंचायती व त्याअंतर्गत २३ वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. या विभागातील एकाही ग्रामपंचायतीने विजेचे बिल भरलेले नाही. विभागातील बहुतांश ग्रामपंचायती बिल भरण्यास सक्षम नाहीत. यापूर्वी शासन साधारणत: सन २०१० च्या दरम्यान ग्रामपंचायतींचे पाणीपुरवठा वीजबिल ५० टक्के व दिवाबत्तीचे वीजबिल १०० टक्के भरत होते. कालांतराने शासनाने यात बदल करत साधारणत: सन २०१५ च्या नंतर ग्रामपंचायतीकडे जमा होणाऱ्या महसुलातूनच वीजबिल भरावे, असा अध्यादेश काढला गेला. व खऱ्या अर्थाने तोव्हापासून ग्रामपंचायती आर्थिक अडचणीत सापडल्या गेल्या.
दरम्यान, या वेळी वीजबिल भरले नाही तर वीजकंपनी कनेक्शन तोडेल, या भीतीने अनेक ग्रामपंचायतींनी आपल्या कुवतीप्रमाणे जमेल तेवढे बिल भरले; परंतु सगळे बिल भरले जात नसल्याने थकीत बिलाचा आकडा आपोआप फुगत गेला. त्यामुळे आज थकीत बिलाचा आकडा लाखाच्या घरात पोहोचल्याचे पाहावयास मिळत आहे. सध्या सर्व ग्रामपंचायतींचे वीज कनेक्शन वीजवितरण कंपनीने थकीत बिलापोटी बंद केले आहे. परिणामी सर्वसामान्य जनतेला वीज व पाण्याविना दिवस काढावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोट...
वीज कनेक्शन बंद झाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. गावच्या महसूल कराचे उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बघितला तर सगळे वीजबिल तेही वेळेत भरणे शक्य नसल्याचे वास्तव चित्र आहे. याचाही शासनाने विचार करणे गरजेचे आहे.
- अशोक पवार, माजी सरपंच, ग्रामपंचायत वाघजाईवाडी
कोट..
चाफळ विभागात एकूण २२ ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत. या २२ ग्रामपंचायतींचे मिळून थकीत वीजबिल हे ५८ लाख ६९ हजार रुपये आहे. वारंवार सूचना देऊनही वीजबिल न भरल्याने नाईलाजाने वीज कनेक्शन बंद करावी लागली आहेत. ज्या ग्रामपंचायत थकीत वीजबिलाचा भरणा करणार आहे, त्यांचे वीज कनेक्शन तातडीने जोडणार आहोत.
-पी. डी. पाटील, कनिष्ठ अभियंता