कोरोना काळात सर्वत्र अंधार... आजीबाईचा बटवा देतोय आधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:38 AM2021-05-26T04:38:52+5:302021-05-26T04:38:52+5:30

सातारा : कोरोना काळात होणारा त्रास आणि कुटुंबीयांची होणारी परवड लक्षात घेता हा त्रास आपल्याला होऊच नये, यासाठी प्रयत्न ...

Darkness everywhere in Corona's time ... Grandma's wallet is giving support! | कोरोना काळात सर्वत्र अंधार... आजीबाईचा बटवा देतोय आधार !

कोरोना काळात सर्वत्र अंधार... आजीबाईचा बटवा देतोय आधार !

Next

सातारा : कोरोना काळात होणारा त्रास आणि कुटुंबीयांची होणारी परवड लक्षात घेता हा त्रास आपल्याला होऊच नये, यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. कोविड काळात सर्वत्रच औषधांचा आणि बेडचा काळाबाजार असल्याने सामान्य हादरून गेले आहेत. अशी परिस्थिती आपल्यावर उदभवू नये म्हणून सर्वत्रच काळजी घेतली जात आहे. या काळात सर्वत्र अंधार दिसत असताना आजीबाईचा बटवा मात्र सर्वांना आधार देत आहे. संक्रमण काळात आयुर्वेदावरचा विश्वास वाढला असून, घरगुती काढे उपयुक्त ठरत आहेत.

कोरोनाशी लढा देण्यासाठी अवघं जग आपापल्या परिनं पाऊल उचलत आहे. आरोग्य यंत्रणेच्या जोडीला गावोगावी अनेक ठिकाणी आयुर्वेदाची कास धरू लागल्याचे सकारात्मक चित्र पहावयास मिळत आहे. सकाळी उठल्यानंतर कोणी देशी गाईचं गोमूत्र पितो, तर कोण मिठाच्या कोमट पाण्याच्या गुळण्या करतो. हे चित्र आता ग्रामीण भागात सर्वत्रच पहायला मिळत आहे. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करून मिठाचे पाणीही पितात. गुळवेलचा काढा अनेकांना लाभदायक असल्याचे मानले जात आहे. या काळात अनेकांनी साखरेऐवजी गुळाच्या चहाला पसंती दिली आहे. देशी गाईच्या दुधात हळद, लवंग, मिरेपुड टाकून पिण्यावरही भर दिला जात आहे.

सामान्य बाबींसाठी डॉक्टरांकडे जाण्याची वेळच येऊ नये म्हणून आजीबाईचा बटवा, ही प्रचलित परंपरा आहे. काळाच्या ओघात ही परंपरा लय पावली; मात्र कोरोना संक्रमणामुळे आजीबाईचा बटवा पुनरुज्जीवित झाल्याचे दिसत आहे. विशेषत: पूर्ण संरक्षण म्हणून कोरोना काळात रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी आयुर्वेदावर आधारित आजीबाईचा बटवा अनेकांना आधार ठरल्याचे दिसते.

कोट

कोविड काळात अनेकांना आयुर्वेद उपचाराचे महत्त्व लक्षात आले आहे. या कठीण काळात आयुर्वेद आशेचा किरण ठरला आहे. भारतीय वैद्यकशास्त्र या कोरोना महामारीच्या संकटात स्वत:ला सिद्ध करत आहे. आता गरज आहे ती शासनाची आणि समाजाची आयुर्वेद उपचार पद्धतीकडे सकारात्मकतेने पाहण्याची.

- वैद्य संतोष महाडिक, सातारा.

गुळवेल सर्वाधिक उपयुक्त

निंबाच्या झाडाला वेटोळा घालत वरती जाणारा वेल म्हणजे गुळवेल. अनेक वर्षांपासून शेतात अनेक झाडांवर असलेली ही अमृतवेली औषधासाठी वापरली जाते, हे ज्ञात नव्हते; पण कोरोनाच्या काळात गुळवेलचे महत्त्व अधोरेखित झाले. गुळवेलच्या कांड्या, निंबाच्या कांड्या, तुळशीची पाने, जांभळीची कोवळी पाने आणि आले एकत्रीत बारीक करून ते रात्रभर पाण्यात टाकून सकाळी शिजवून घ्यायचे. त्यानंतर चाळणीने गाळून हे पाणी बाटलीत ठेवून रोज त्याचे सेवन करणं उपयुक्त ठरते.

- शकुंतला बाबर, पंताचा गोट

प्रतिकारशक्तीला बळ द्या

आले व हळद कुसकरून घेतले की ठसका उतरतो आणि खोकला बंद होतो. जिरा व कलमीचे उकळून घेतलेले पाणी पिले तर ज्वर शांत व्हायला मदत होते. हे उपचार पुढच्या पिढीपर्यंत गेले, त्याचे कारण म्हणजे आजीबाईचा बटवा हेच आहे; मात्र हे उपचार घ्यायला अनेक जण कचरतात. डॉक्टरांनाच प्राधान्य दिले जात असल्याने आजीबाई अडगळीत पडली होती, आता कोविडमुळे पुन्हा एकदा ती मुख्य प्रवाहात आली.

- सईदा पठाण, बुधवार नाका

रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आजीबाईचा बटवा उत्तम आहे. पूर्वी कोणालाही काही त्रास वाटला की घरातील ज्येष्ठ मंडळी प्रामुख्याने आजी काहीना काही घरगुती उपचार करून स्वस्थ करते. कोरोनामुळे आजीबाईच्या बटव्याची आठवण होत आहे. हळद, मिरे, लसूण, तुळस, मेथी, जिरे, हिंग, धने अशा अनेक औषधांचा वापर आजीबाईच्या बटव्यात होतो. संसर्गजन्य आजारात घटलेली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी याचा वापर होतो; मात्र आजाराची लक्षणे वेळीच थांबत नसतील तर वेळ न घालवता वैद्यांशी बोलणं आवश्यक आहे.

- प्रभावती मोरे, शाहूपुरी.

कशाचा काय फायदा

शेणाच्या गोवरीच्या विस्तवावर हळद व ओवा टाकून त्याचा धूर करून जोरात श्वास घेतल्याने तो फुफ्फुसापर्यंत ओढला जातो

हुलग्याचे मांडगे खाल्ले तर मधुमेह असलेल्यांना चांगला फायदा होतो.

कोमट पाण्यात मीठ व हळद टाकून त्याच्या गुळण्या केल्याने घशातील विषाक्त पदार्थ तत्काळ निघून जातात. घशातील जडपणा कमी होतो आणि घसा मोकळा होतो

मिठाच्या गुळण्या अनेकांना माहीत होत्या. कोविड काळात त्यात हळदीचा केलेला समावेश उपयुक्त ठरत आहे.

पॉईंटर

दोन ऋतुंमधील पर्यावरणीय हवापालट असल्याने मानवी शरीर हा बदल चटकन स्वीकारत नसते, त्यामुळे सर्दी, खोकला, ताप याचा त्रास होतो. अशा वेळी आजीबाईचा बटवा उपयोगी ठरतो.

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण :

कोरोनामुक्त झालेले रुग्ण :

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण : १ लाख ५३ हजार ५०६

कोरोना मृत्यू : ३ हजार ४८९

Web Title: Darkness everywhere in Corona's time ... Grandma's wallet is giving support!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.