इवल्या दोन ज्योतींच्या डोळ्यांपुढं आता अंधार!
By Admin | Published: August 4, 2015 11:19 PM2015-08-04T23:19:40+5:302015-08-04T23:19:40+5:30
विवाहितेची आत्महत्या : आई गेली; उर्वरित कुटुंब पोलिसांच्या ताब्यात
सातारा : वंशाला दिवा हवा. ज्योती मात्र नकोत, ही मानसिकता समाजात आजही कायम आहे. नेमका हाच आरोप वैशाली सुतारच्या माहेरच्यांनी सासरच्या लोकांवर केलाय. दोन मुलीच झाल्या म्हणून तिचा छळ होत असल्याचं तक्रारीत म्हटलंय. वैशालीनं विहीर जवळ केली. घरातल्या बाकीच्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दोन इवल्या ज्योतींच्या डोळ्यापुढं मात्र अंधार झाला.श्रावणी तीन वर्षांची आहे. कार्तिकी तर अवघ्या आठ महिन्यांची. आत्महत्या करणाऱ्या वैशाली सुतारच्या या दोन मुली. वैशालीच्या आई कुसूम वसंत संकपाळ (रा. रेंगडी, ता. जावळी) यांनी फिर्यादीत म्हटलंय की, माहेरून पैसे आणि धान्य आणण्याची मागणी २०१२ पासून वैशालीच्या घरातले वेळोवेळी करीत असत. शिवाय पदरी दुसरी मुलगीच. त्यामुळं जाचहाट वाढला आणि अखेर वैशालीनं आत्महत्येचा मार्ग निवडला.गडकर आळीतील जवाहर कॉलनीत राहणाऱ्या सुतार कुटुंबातल्या सात जणांविरुद्ध ही फिर्याद आहे. वैशालीचा पती मंगेश, सासरा अशोक, सासू मंगल, रूपेश आणि योगेश हे दोन दीर आणि कविता-अमृता या जावांना पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतलं. संतप्त रेंगडी ग्रामस्थ दिवसभर पोलीस ठाण्यात आणि जिल्हा रुग्णालयात तळ ठोकून होते. आख्खं गावच साताऱ्यात आलं होतं. वैशालीच्या पार्थिवावर तिच्या सासरच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करणार, असा आग्रह ग्रामस्थांनी धरला होता. पोलीस तणावाखाली होते. शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर आणि नंतर जिल्हा रुग्णालयातही अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर ग्रामस्थांना सामोरे गेले. ‘कायदा हातात घेऊ नका. सहकार्य करा. दोषींवर कायद्यानुसार जास्तीत जास्त कडक कारवाई होईल,’ असा विश्वास त्यांनी दिला. आधी ग्रामस्थांनी घातपाताचाच संशय व्यक्त केला होता. रुग्णालयात वैशालीचा मृतदेह पाहिल्यावर आक्रोश आणि संताप वाढला. गडकर आळीतील काही व्यक्तींनीही ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. अखेर ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आणि तणाव निवळला. एक प्रश्न मात्र कायम राहिला... चिमुकल्या श्रावणी आणि कार्तिकीचं काय?
मृत वैशालीबद्दल गावकरी मोठ्या आदरानं बोलत होते. संपूर्ण रेंगडी गावात अत्यंत गुणी मुलगी असा तिचा लौकिक होता. वैशालीला दोन भाऊ आणि एक बहीण. वैशाली सर्वांत थोरली. पाठच्या बहिणीचं लग्न झालंय आणि तीही गडकर आळीतच वास्तव्याला आहे. दोन भाऊ लहान आहेत. (प्रतिनिधी)
रविवारीही आले होते गावकरी
रेंगडी ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या सासरच्या मंडळींनी रविवारी सकाळी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. त्याच रात्री ‘आमचीही तक्रार घ्या,’ असे म्हणत रेंगडी ग्रामस्थ पोलीस ठाण्यात आले. परंतु तांत्रिकदृष्ट्या एक फिर्याद दाखल असताना दुसरी घेता येणार नाही, असं सांगून पोलिसांनी त्यांना जबाब द्यायला सांगितलं. ‘पहाटेपर्यंत आम्ही पोलीस ठाण्यासमोर पावसात होतो,’ असं गावकऱ्यांनी सांगितलं.