कास पठारावर पंद, दीपकाडी व चवरचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:44 AM2021-08-13T04:44:14+5:302021-08-13T04:44:14+5:30
पेट्री : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गर्दीची ठिकाणे, प्रार्थनास्थळे, ऐतिहासिक ठिकाणे, पर्यटनस्थळे बंद असून, या परिसरातील पर्यटनस्थळी पर्यटकांना ...
पेट्री : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गर्दीची ठिकाणे, प्रार्थनास्थळे, ऐतिहासिक ठिकाणे, पर्यटनस्थळे बंद असून, या परिसरातील पर्यटनस्थळी पर्यटकांना पर्यटनास बंदी आहे. सर्वत्र पर्यटनस्थळं लॉक; परंतु निसर्गातील रानफुलं हळूहळू उमलून, फुलून बहरताना दिसत आहेत.
पंद (पिंडा कोंकणांसीस)
जमिनीत असणाऱ्या कंदापासून ही वनस्पती उगवते. गोल बटाट्यासारखा कंद असून, त्यातून कोंब बाहेर येऊन षटकोनी आकाराची फांदी मोठी होत जाते. पांढऱ्या रंगाची गोल आकाराची फुले येतात. कंद खाणारे प्राणी, रानडुक्कर, सायाळ आदी तृणभक्षी प्राणी या कंदाचा आस्वाद घेतात.
दीपकाडी (दीपकाडी मॉन्टेनम)
ही वनस्पती सुंदर व दिसण्यास मोहक असते. लसूण कुळातील ही वनस्पती जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिसून येते. जमिनीमध्ये लसणासारखा कंद त्यावर पानांच्या तीन ते चार पाकळ्या असतात. त्यातून एक उगवलेल्या दांडीवर छोटी छोटी चार-पाच फुले येतात. दीपस्तंभासारखी दिसतात म्हणून दीपकाडी म्हणतात.
चवर (हिच्चीनीया कावलीना)
ही वनस्पती सह्याद्रीच्या व कोकण रांगांमध्ये दिसते. आल्याच्या वर्गातील वनस्पती आहे. जमिनीत हळद किंवा आलेसारखे लांबट आकाराचे कंद दिसून येतात. याच कंदातून पठारावर पांढऱ्या रंगांची फुले उमलतात. यास चवर किवा चवेटा म्हणतात. पाने करदळीच्या पानांसारखी लांबट असतात. हळद किंवा आलेच्या जंगली जाती अनेक असून, जुलै महिन्यात येणारी पांढऱ्या फुलांची ही जात चवेटा या नावाने ओळखतात. ‘हिच्चीनीया कावलीना’ असे शास्त्रीय नाव आहे.
गवेली : ही वेलवर्गीय आहे. पिपाणीच्या आकाराचे फूल असते. आयफोमिया असे शास्त्रीय नाव आहे. काळी व पांढरी गवेली असे दोन प्रकार असतात. हे पांढऱ्या गवेलीचे फूल आहे.
सोनकी : सोनकी नावाची वनस्पती ही सोन्यासारखी आहे. जुलै महिन्यात उगवणारी ही वनस्पती सोनकी, सोनकडी, शेनकडी अशा अनेक नावाने ओळखली जाते. याचे हिवाळी सोनकी, काळ्या तिळाची सोनकी, पात्री सोनकी, गजरा सोनकी असे अनेक प्रकार आहेत. जुलै महिन्यातील ही सोनकी लोकांना, पक्ष्यांना आकर्षित करते.