सज्जनगडावरील दासनवमी उत्सवास आजपासून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:18 AM2021-02-28T05:18:26+5:302021-02-28T05:18:26+5:30
परळी : सज्जनगडावरील दासनवमी महोत्सवास रविवारपासून सुरुवात होत असून यात्रेचा मुख्य दिवस दासनवमी ही ७ मार्चला होत आहे. यंदाचा ...
परळी : सज्जनगडावरील दासनवमी महोत्सवास रविवारपासून सुरुवात होत असून यात्रेचा मुख्य दिवस दासनवमी ही ७ मार्चला होत आहे. यंदाचा दासनवमी महोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा होणार आहे, अशी माहिती समर्थ रामदास स्वामी संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब स्वामी, समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह योगेश बुवा रामदासी यांनी दिली.
गडावर दासनवमी उत्सव जे धार्मिक विधी संपन्न होतात ते नित्यनियमाने सुरूच राहणार आहेत. तसेच शनिवारी सकाळी उदवर्चनाने दासनवमी महोत्सवास सुरुवात झाली. श्रीसमर्थ रामदास स्वामीजी तंजावरला गेले असताना, समर्थांनी अंध कारागिराकडून पंचधातूच्या श्रीराम, लक्ष्मण, सीता व मारुतीराय (श्रीराम पंचायतन) या मूर्ती बनवून घेतल्या. त्या मूर्ती समर्थांच्या महानिर्वाणाच्या ५ दिवस आधी श्रीक्षेत्र सज्जनगड येथे पोहोचल्या व श्रीसमर्थांनी याच मूर्तींच्या समोर रामनामाचा जप करत आपला देह सोडला. या श्रीराम पंचायतन मूर्तींना वर्षातून फाल्गुन अमावस्या, आषाढ शुद्ध दशमी, भाद्रपद अमावस्या, माघ पौर्णिमा, माघ अमावस्या या पाच दिवशी षोडशोपचारे पूजन, पवमान अभिषेक व मूर्ती स्वच्छ केल्या जातात. या सर्व सोहळ्याला संप्रदायात उदवर्चन सोहळा असे म्हणतात. रविवारी गडावर मुहूर्तमेढ, कोटी पूजन हे कार्यक्रम संपन्न होणार आहेत.