सज्जनगडावरील दासनवमी महोत्सव साधेपणाने होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:54 AM2021-02-25T04:54:16+5:302021-02-25T04:54:16+5:30
सज्जनगडावरील श्रीरामदासस्वामी यांचा ३३९वा दासनवमी महोत्सव २८ फेब्रुवारी २०२१ ते ७ मार्च २०२१ या कालावधीत साजरा होणार आहे. यावर्षी ...
सज्जनगडावरील श्रीरामदासस्वामी यांचा ३३९वा दासनवमी महोत्सव २८ फेब्रुवारी २०२१ ते ७ मार्च २०२१ या कालावधीत साजरा होणार आहे. यावर्षी प्रथमच कोरोना प्रादुर्भावामुळे उत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती श्रीरामदासस्वामी संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.
या कालावधीत गेली ३३८ वर्षे चालू असलेल्या परंपरेनुसार सर्व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. भाविकांसाठी मंदिरे बंद राहतील. तसेच उत्सव काळात जमावबंदीचे कलम १४४ लागू असल्याने पाचपेक्षा जास्त लोकांना मंदिर परिसरात एकत्र येता येणार नाही. अन्नदान सेवा उपलब्ध असणार नाही. भक्तांनी दासनवमी उत्सवात सज्जनगडावर येणे टाळावे. श्रीरामदासस्वामी संस्थान, सज्जनगड या सोशल माध्यमाद्वारे उत्सवकाळातील सर्व धार्मिक कार्यक्रम, श्रीसमर्थ स्थापित श्रीराम पंचायतन आणि श्रीसमर्थ समाधी यांच्या प्रत्यक्ष प्रक्षेपणाची व्यवस्था केली जाणार आहे.
दासनवमी उत्सवानंतर कोरोना संसर्ग नियमास अनुसरून मंदिरे दर्शनासाठी खुली होतील आणि अन्नदान, विनामूल्य निवास व्यवस्था वगैरे सेवा संस्थानतर्फे पुनश्च सुरू होतील. भक्तांनी प्रशासन, पोलीस, ग्रामपंचायत परळी आणि संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.