तीन चिमुरड्यांना नदीत फेकून दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Published: March 14, 2017 11:02 PM2017-03-14T23:02:06+5:302017-03-14T23:02:06+5:30

कऱ्हाडातील घटना; पती बचावला; पत्नीसह तिघांचे मृतदेह आढळले; एक मुलगा बेपत्ता

Daughter's suicide attempt by throwing three chimneys in the river | तीन चिमुरड्यांना नदीत फेकून दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

तीन चिमुरड्यांना नदीत फेकून दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Next



कऱ्हाड : कर्जाला कंटाळून दाम्पत्याने आपल्या तीन चिमुरड्यांना नदीपात्रात फेकून देऊन त्यांचा खून केला. त्यानंतर स्वत: दोघांनी नदीत उडी घेतली. मात्र, पती सुरक्षितरीत्या नदीपात्रातून बाहेर पडला. आणि पत्नीसह दोन मुले व चार महिन्यांच्या मुलीचा नदीत बुडून मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळपर्यंत पत्नीसह मुलगी व एका मुलाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला असून, एका मुलाचा रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात शोध घेतला जात होता.
पती अमोल हणमंत भोंगाळे (वय २८) हा बचावला आहे. तर मीनाक्षी (२३), हर्ष (साडेतीन वर्ष), श्रवण (दीड वर्ष) व चार महिन्यांची मुलगी यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापुरात बैलबाजार रोडलगत अजंठा पोल्ट्री फार्मसमोर अमोल भोंगाळे हा पत्नी मीनाक्षी, मुलगा हर्ष व श्रवण, तसेच चार महिन्यांच्या मुलीसह वास्तव्यास होता. आर्थिक परिस्थिती खालावल्याने सध्या हे कुटुंब नैराश्येत होते. त्यातच अनेक महिन्यांपासून अमोल काम करीत नव्हता. हातउसने व कर्ज स्वरूपातही त्याने अनेकांकडून पैसे घेतले होते. हे पैसे त्याने परत केले नव्हते. काहींनी त्याच्याकडे पैशासाठी तगादाही लावला होता. परिणामी, अमोलसह त्याची पत्नी मीनाक्षी हे दोघेही तणावाखाली होते. याच नैराश्येतून त्यांनी सोमवारी रात्री आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
अमोल व मीनाक्षी त्यांच्या हर्ष, श्रवण तसेच चार महिन्यांच्या मुलीला घेऊन मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून कोल्हापूर नाक्यानजीक पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कोयना पुलावर आले. तेथून अमोलने त्याचा चुलत भाऊ सतीश शंकर भोंगाळे याला फोन केला. ‘मी कुटुंबासह कोयना पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या करीत आहे,’ असे त्याने सतीशला सांगितले. त्यावेळी ‘आत्महत्या करू नकोस. मी तिथे येतो. तू थांब,’ असे सतीश म्हणाला. मात्र, अमोलने त्याचे काहीही न ऐकता फोन कट केला. घाबरलेल्या सतीशने तातडीने याबाबतची माहिती कऱ्हाड शहर पोलिसांना दिली. त्यावेळी रात्रगस्तीवर असणारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्यासह कर्मचारी कोल्हापूर नाक्यानजीकच्या पुलावर पोहोचले. तसेच सतीश व त्याचा मित्र रामचंद्र डमाकले हे सुद्धा त्याठिकाणी आले. महामार्गावरच त्यांना अमोलची दुचाकी आढळून आली. तसेच पुलाच्या कठड्यावर मीनाक्षी व अमोलची चप्पल तसेच अमोलचा मोबाईल आढळून आला. सर्वांनीच नदीपात्रात उडी घेतल्याची शक्यता बळावल्याने पोलिसांनी तातडीने शोध सुरू केला.
दरम्यान, या घटनेनंतर सुमारे एक तासाने अमोल नदीपात्रातून बाहेर आला. घटनास्थळी शोध घेणाऱ्या पोलिसांना तो सापडला. ‘कोणीतरी मला नदीतून बाहेर काढले. मात्र, कोणी काढले हे माहीत नाही,’ असे त्याने पोलिसांना सांगितले. त्याची प्रकृती खालावल्यामुळे पोलिसांनी त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मंगळवारी सकाळपासून पाणबुड्यांच्या साह्याने नदीपात्रात मीनाक्षीसह दोन मुले व मुलीचा शोध घेतला जात होता. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात कोयनेश्वर मंदिरापासून काही अंतरावर चार महिन्यांच्या मुलीचा मृतदेह पाणबुड्यांना आढळून आला. संबंधित मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. त्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कोयनेश्वर मंदिरापासून काही अंतरावरच मीनाक्षीचा, तर चार वाजण्याच्या सुमारास एका मुलाचा मृतदेह आढळला. रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या मुलाचा नदीपात्रात शोध घेतला जात होता. याबाबतची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत झाली आहे.

मुलांना स्वत:च्या हाताने नदीत फेकले
नवीन कोयना पुलावर पोहोचल्यानंतर सुरुवातीला अमोलने दीड वर्षाच्या श्रवणला उचलून नदीत फेकले. त्यानंतर मीनाक्षीने तिच्याजवळील चार महिन्यांच्या मुलीला नदीत टाकले. तसेच साडेतीन वर्षांच्या हर्षला दोघांनी मिळून उचलले व नदीत फेकले, अशी माहिती अमोलने तपासादरम्यान दिली असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले. अमोल व मीनाक्षीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे निरीक्षक जाधव म्हणाले.

पोलिस दुपारपर्यंत संभ्रमात
नदीपात्रातून बाहेर पडलेल्या अमोलने ‘मला कोणीतरी बाहेर काढले,’ असे सांगितले. मात्र, कोणी काढले हे त्याला सांगता येत नव्हते. तसेच रात्री तो नाईट पॅन्ट घालून घरातून बाहेर पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती; पण पात्रातून बाहेर आल्यानंतर त्याच्या अंगावर दुसरीच पॅन्ट होती. ‘कोणीतरी माझे कपडे बदलले,’ असे तो पोलिसांना सांगत होता. या विसंगतीमुळे पोलिस घटनेबाबत संभ्रमात होते.


२७ लाखांचे कर्ज!
अमोल २०११ पासून नोकरी करीत नव्हता. त्यापूर्वी त्याने हमाली केली होती. तसेच एका बारमध्येही तो नोकरीस होता. मात्र, काही वर्षांपासून तो काहीच काम करीत नव्हता. घरखर्च व इतर खर्च भागविण्यासाठी त्याने अनेकांकडून पैसे घेतले होते. प्रथमदर्शनी त्याच्यावर २७ लाखांचे कर्ज असल्याची माहिती पोलिस तपासात समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

म्हणे... बदनामी वाईट असते!
काही दिवसांपूर्वी अमोल एका कामानिमित्त परगावी गेला होता. त्याठिकाणीच त्याने चार दिवस मुक्काम केला. मात्र, सर्वांचे पैसे घेऊन अमोल पळून गेल्याची चर्चा झाली. अमोल घरी परत आल्यानंतर त्याला याबाबत समजले. ‘आपण कोणाचेही पैसे घेऊन पळून गेलो नव्हतो. माझी विनाकारण बदनामी झाली. बदनामी वाईट असते,’ असे अमोलने पोलिसांना तपासादरम्यान सांगितले आहे.

मोबाईल कठड्यावर का ठेवला?
नदीपात्रात उडी घेण्यापूर्वी अमोलने भाऊ सतीशला मोबाईलवर फोन केला होता. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना अमोलचा मोबाईल, चप्पल व इतर साहित्य पुलाच्या कठड्यावरच मिळाले. त्यामुळे आत्महत्येचा विचार करणारी व्यक्ती मोबाईल व इतर साहित्य काढून ठेवेल का, अशीही शंका पोलिसांच्या मनात उपस्थित झाली होती. त्यामुळे संभ्रम आणखीनच वाढत होता. घटनेबाबत पोलिस दुपारपर्यंत अमोलकडे कसून चौकशी करीत होते. अशातच मुलीचा मृतदेह आढळून आल्याने घटनेची खात्री झाली.
 

Web Title: Daughter's suicide attempt by throwing three chimneys in the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.