दौंडेवाडीत एकरात २४ टन कांद्याचे उत्पादन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:26 AM2021-06-29T04:26:08+5:302021-06-29T04:26:08+5:30
पुसेगाव : दौंडेवाडी (ता. खटाव) येथील सुरेश गायकवाड या शेतकऱ्याने लॉकडाऊनच्या काळात अहोरात्र कष्ट घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ...
पुसेगाव : दौंडेवाडी (ता. खटाव) येथील सुरेश गायकवाड या शेतकऱ्याने लॉकडाऊनच्या काळात अहोरात्र कष्ट घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एका एकरात केवळ साडेतीन महिन्यांत २४ टन कांद्याचे विक्रमी उत्पादन घेतले.
कांद्याला भावदेखील समाधानकारक मिळाल्याने मंदीच्या काळातही हा शेतकरी आर्थिकदृष्ट्या मालामाल झाला आहे. जाखणगावच्या पश्चिमेला डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या छोट्या-मोठ्या वाड्या-वस्त्यांमध्ये कायम पाण्याचे दुर्भीक्षच जाणवते. हलकी व मुरमाड जमीन, प्रतिकूल व लहरी हवामानाचा फटका येथील शेतकऱ्यांना नेहमीच सहन करावा लागतो. मात्र, अशा परिस्थितीतही येथील शेतकरी सुरेश गायकवाड यांनी कोरोनाच्या काळात वेळेचा सदुपयोग करत शेतात नेटक्या नियोजनातून, कमी खर्चात व कमी कालावधीत प्रयोग करत भरघोस उत्पन्न घेतले.
केवळ साडेतीन महिन्यांत उन्हाळी कांद्याचे विक्रमी एकरी २४ टन उत्पादन घेतले. दरम्यान, दराअभावी कांदा ऐरणीत योग्यरितीने साठवून ठेवल्याने कांदा नासला नाही. गेल्या आठवड्यात कांद्याच्या दरात थोडी वाढ झाली आहे. त्यामुळे गायकवाड यांनी कांद्याची विक्री केली. कांद्याचा आकारही मोठा असून, दोन ट्रकमध्ये केवळ चार पिशव्या लहान कांदा आढळून आला.
(कोट)
हवामान बदलानुसार खत, औषध फवारणी व्यवस्थापन, ठिबक सिंचन व मेहनतीने यशस्वी शेती करता येते. कोरोना काळात नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरण्यापेक्षा शेतात आपला वेळ घालवत नवीन प्रयोग करून कृषी उत्पादनात निश्चितच वाढ होऊ शकते.
- सुरेश गायकवाड, शेतकरी, दौंडेवाडी
२८ पुसेगाव
दौंडेवाडी (ता. खटाव) येथील शेतकरी सुरेश गायकवाड यांनी कांद्याचे विक्रमी उत्पादन घेतले.