साताऱ्यात डॉक्टर महिलेला दाऊद गँगची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 02:42 PM2019-12-13T14:42:52+5:302019-12-13T14:54:45+5:30
साताऱ्यातील महिला डॉक्टरला अनोळखीने मोबाईलवर खंडणीसाठी धमकीचा मेसेज केल्याने खळबळ उडाली असून, याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खंडणीची रक्कम न दिल्यास डॉक्टरसह कुटुंबीयांना शूट करण्याची धमकीही देण्यात आली आहे. दरम्यान, हा मेसेज इंग्लिशमध्ये टाकण्यात आला असून, त्यामध्ये इफ यू वोंट गिव्ह ८०,००० विल शूट यू अँड यूअर फॅमिली सून. दाऊद गँग असा उल्लेख आहे.
सातारा: साताऱ्यातील महिला डॉक्टरला अनोळखीने मोबाईलवर खंडणीसाठी धमकीचा मेसेज केल्याने खळबळ उडाली असून, याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खंडणीची रक्कम न दिल्यास डॉक्टरसह कुटुंबीयांना शूट करण्याची धमकीही देण्यात आली आहे. दरम्यान, हा मेसेज इंग्लिशमध्ये टाकण्यात आला असून, त्यामध्ये इफ यू वोंट गिव्ह ८०,००० विल शूट यू अँड यूअर फॅमिली सून. दाऊद गँग असा उल्लेख आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्यातील महिला डॉक्टरला दि. १२ रोजी मोबाईलवर मेसेज आला. हा मेसेज महिला डॉक्टर यांनी वाचल्यानंतर त्या घाबरल्या. याबाबतची माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर त्यांनी पोलीस मुख्यालयापाठीमागील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना मेसेजबाबत माहिती सांगून तो मेसेज दाखवला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार धमकीचा मेसेज असलेला मोबाईल क्रमांक परदेशातील असण्याची शक्यता आहे. पोलीस तपासानंतर याप्रकरणातील वस्तूस्थिती समोर येणार आहे.
दरम्यान, सातारा पोलीस दलातर्फे नागरिक, व्यावसायिक यांना आवाहन करण्यात आले आहे की, जर मोबाईलद्वारे कोणालाही खंडणीचा मेसेज आला असेल तर तत्काळ सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. आधुनिक तंत्रज्ञानाचा दैनंदिन व्यवहारामध्ये वापर करत असताना नागरिकांनी जागरुक राहावे, असे आवानही पोलिसांनी केले आहे.
एका वकिलाही हाच मेसेज...
दोन दिवसांपूर्वी साताऱ्यातील वकील धीरज घाडगे यांनाही असाच मेसेज आला आहे. त्यांनीही तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली आहे. खंडणीची रक्कम पाहता, हा खोडसाळपणा कुणी तरी केला असावा, अशी शक्यताही पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.