विशेष बालकांना ‘डे केअर’चा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 11:31 PM2018-09-09T23:31:12+5:302018-09-09T23:31:15+5:30
प्रगती जाधव-पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : बाई उद्या शाळेत येणार नाहीत म्हटलं की ही मुलं हिरमुसतात... बार्इंनी फुकट काही द्यायचं नाही म्हटलं की घरातल्यांकडूनही पैसे घेतात... घर आणि शाळेत फारसा फरक न करता ही मुलं तशीच राहतात, या मुलांविषयी ऐकताना काहीसं आश्चर्य वाटतं ना? खरोखरंच ही मुलं आणि त्यांना शिकवणारे शिक्षक एकदम विशेष आहेत !
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच या कायद्यातील तरतुदीनुसार वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत प्रत्येक विशेष गरज असणाऱ्या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नोव्हेंबर २०१३ मध्ये शालेयपूर्व कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली. लघुकालीन अनिवासी व निवासी असे या वर्गाचे स्वरूप आहे. सातारा जिल्हा परिषदेने या ‘डे केअर’ सेंटरला सुरुवात केली.
तत्कालीन जिल्हाधिकारी रामास्वामी एन. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बांगर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. पालिकेच्या शाळा क्रमांक २० मध्ये हे सेंटर पाच वर्षांपासून सुरू आहे. एक शिक्षक, एक फिजिओथेरपिस्ट यांच्या सहकार्याने वर्ग सुरू झाला. पूर्वी अवघ्या दोन विद्यार्थ्यांसह सुरू झालेल्या या सेंटरमध्ये सध्या १५ मुलं आणि त्यांचे पालक असतात.
बहुविकलांग, मतिमंद, सेलिब्रेल पारसी, मतिमंद असे विद्यार्थी या सेंटरमध्ये कौशल्य प्रशिक्षणाचे धडे गिरवत आहेत. नियमित विद्यार्थ्यांपेक्षा त्यांचा अभ्यासक्रम वेगळा असतो. वस्तू हातात धरता येणं, वस्तू ओळखणं, स्वत:चे काम स्वत: करणं हा त्यांच्या अभ्यासाचा एक भाग आहे. या सेंटरचा नावलौकिक लक्षात घेता गेल्या काही दिवसांपासून येथे येणाºया मुलांची संख्या वाढत आहे. मात्र, मर्यादित साधनसामग्री असल्यामुळे प्रवेशावरही मर्यादा आहेत.
सध्या विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचं काम अश्विनी रानडे करतात. तर डॉ. रोहित बर्गे मुलांकडून व्यायाम करून घेतात. शाळेतील मुलांची प्रगती उत्तम असून, या केंद्रातून काही विद्यार्थी नियमित शाळेत दाखल झाले आहेत. शाळेचे काही विद्यार्थी स्वयंरोजगार करू लागले आहेत, हे विशेष !
जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाºया या सेंटरमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांचेही विशेष लक्ष आहे. दानशूर व्यक्तींनी केंद्राच्या मोठ्या जबाबदाºया उचलल्या आहेत. या सेंटरमधून बाहेर पडलेले विद्यार्थी कौशल्य घेऊन आपली गुजराण करू शकतात इतकी सक्षमता त्यांच्यात निर्माण करण्याचं श्रेय केवळ इथं झटणाºया सगळ्यांचं म्हणावं लागेल.
दिग्गजांनी केले कौतुक
राज्यभरात असे ‘डे केअर’ सेंटर सुरू करण्यात आले होते. मात्र, बहुतांश ठिकाणी हे सेंटर बंद अवस्थेत आहे. सातारा येथील सेंटरची यशोगाथा पाहण्यासाठी जागतिक बँकेचे अधिकारी असो वा युनिसेफचे पदाधिकारी त्यांनी सेंटर आणि तिथल्या विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. अभिप्राय वहीत या मान्यवरांचे अभिप्राय सेंटरविषयी अभिमान निर्माण करून देतात, हे नक्की !