पॅनेल रचनेसाठी रात्रीचा दिवस
By Admin | Published: March 27, 2015 09:43 PM2015-03-27T21:43:50+5:302015-03-28T00:09:27+5:30
ग्रामपंचायत निवडणुका : सोसायट्या, पतपेढ्या, सहकारी संस्था पाठोपाठ पुन्हा वातावरण तापणार
खंडाळा : गावोगावी विकास सेवा सोसायट्या, सहकारी पतपेढ्या, सहकारी संस्था यांच्या निवडणुकांमध्ये राजकीय फड तापलेले आहेत. त्यातच अचानकपणे ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्याने पॅनेल रचनेसाठी रात्रीचा दिवस केला जात आहे. मात्र, ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण न होताच मुदतपूर्व निवडणुका लागत असल्याने संभ्रमावस्था आहे. तरीही गावात पत तरच तालुक्यात रुबाब. यामुळे गावपुढारी व्यूहरचनेत मग्न आहेत.खंडाळा तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींची मुदत सप्टेंबरअखेर संपत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या सर्वच ग्रामपंचायतींच्या निवडणुका २२ एप्रिलला होणार आहेत. मात्र तीन-चार महिने अगोदरच निवडणुका घेण्यामागचा उद्देश लोकांना संभ्रमात टाकणारा आहे.
विद्यमान सदस्यांचा कार्यकाल पूर्ण होत नाही. आणि वास्तविक ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी सरपंचपदी आरक्षणे जाहीर होणे गरजेचे आहे. यापैकी कोणता निर्णय न होताच निवडणुकांचा कालावधी जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणुकांचा हा निर्णय सोशल मीडियाद्वारे त्याचरात्री गावोगावी पोहोचला आणि गावातील नेतेमंडळींची झोपच उडाली. दुसऱ्याच दिवसांपासून पॅनेलचा रचनेसाठी धावाधाव सुरू झाल्याचे चित्र सर्वत्रच पाहायला मिळत आहे.गावोगावी सोसायटी निवडणुकीचे रणांगण तापले असतानाच ग्रामपंचायतीचा धुरळा उडाला असल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सोसायटीच्या निवडणुकीत नाराज असलेल्यांची मर्जी संपादन करण्यात पुढाऱ्यांचा बराचसा वेळ जात आहे. एरव्ही खिजगणीतही नसलेली मंडळीही उसने अवसान आणून दंड थोपटण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अशांना थोपविण्यासाठी नेत्यांची धावपळ सुरूच आहे. याशिवाय गटातील मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी मतदारांना बांधून घेण्यासाठी राजकीय नेत्यांकडून विविध शक्कल लढविल्या जात आहेत. त्यामुळे वरवर वाटणारी ग्रामपंचायत निवडणूक घराघरात डोकावली जात आहे. (प्रतिनिधी)
गट-तटाचा यात्रांवर होणार परिणाम
तालुक्यात सध्या यात्रा, जत्राचा हंगाम जोरदार सुरू आहे. त्यातच निवडणुका लागल्याने गावतळीवरील वातावरण संवदेनशील बनण्याची दाट शक्यता आहे. गटातटाच्या राजकारणाचा परिणाम यात्रांवर निश्चितपणे जाणवणार आहे. गावची एकोप्याची परंपरा धोक्यात येण्याची चिन्हे असल्याने निवडणुकांना तेवढ्याच पातळीवर ठेवणे गरजेचे आहे. इच्छुकांनी मात्र वार्डावार्डात आपले वर्चस्व कसे आहे. हे सिद्ध करण्यावर भर दिला असल्याचे पॅनेलप्रमुखांना उमेदवारी देताना कस लावावा लागणार आहे.