Satara: कण्हेर धरणात बुडालेल्या अकलूजच्या भावी डाॅक्टरचा मृतदेह सापडला

By दत्ता यादव | Published: April 24, 2023 02:09 PM2023-04-24T14:09:06+5:302023-04-24T14:09:23+5:30

पोहताना धरणाच्या मधोमध गेल्यानंतर स्वराजला दम लागला अन् तो गटांगळ्या खात बुडाला

Dead body of future doctor of Akluj found drowned in Kanher Dam | Satara: कण्हेर धरणात बुडालेल्या अकलूजच्या भावी डाॅक्टरचा मृतदेह सापडला

Satara: कण्हेर धरणात बुडालेल्या अकलूजच्या भावी डाॅक्टरचा मृतदेह सापडला

googlenewsNext

सातारा : कण्हेर, ता. सातारा गावच्या हद्दतील कण्हेर धरणात बुडालेल्या अकलूजच्या  भावी डाॅक्टरचा तिसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी धरणात तरंगत असलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

स्वराज संभाजी माने-देशमुख (वय २३, रा. अकलूज, सध्या रा. मंगळवार पेठ, सातारा) असे मृत भावी डाॅक्टरचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अक्षय तृतीया व रमजान ईदनिमित्त शनिवार, दि. २२ रोजी सर्व काॅलेज व शाळांना सुटी होती. साताऱ्यातील नामांकित मेडिकल काॅलेजची दहा मुले कण्हेर धरणात पोहण्यासाठी गेली होती. त्यांच्यासमवेत स्वराज सुद्धा गेला होता. स्वराजला चांगले पोहता येत होते. त्याच्यासह अन्य दोन मुले पोहण्यासाठी धरणात उतरली. 

स्वराज आणि त्याचे दोन मित्र पोहत धरणात दूरवर गेले. धरणाच्या मधोमध गेल्यानंतर तिघेही मुले परत निघाली. मात्र, त्यावेळी स्वराजला दम लागला. तो गटांगळ्या खाऊ लागला. हा प्रकार त्याच्यासोबत असलेल्या दोन मित्रांच्या निदर्शनास आला. परंतु त्यांनाही दम लागल्यामुळे ती दोन्ही मुले कशीबशी धरणाच्या काठावर पोहत आली. त्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. धरणात मधोमध अंतर खूप असल्यामुळे कोणालाही स्वराजजवळ पोहोचता आले नाही. अखेर तो धरणात बुडाला. 

या प्रकाराची माहिती पोलिसांसह शिवेंद्रसिंहराजेंच्या रेस्क्यू टीमला मिळाल्यानंतर त्यांनी पहिल्या दिवशी साडेपाच तास शोध माेहीम राबविली. मात्र, स्वराजचा मृतदेह सापडला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी पुन्हा सात वाजता शोध मोहीम हाती घेण्यात आली. परंतु हाती मृतदेह लागलाच नाही. अखेर तिसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा रेस्क्यू टीम धरणाजवळ पोहोचली. त्यावेळी स्वराजचा मृतदेह तरंगत काठावर आला होता. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून स्वराजचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.

यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर नातेवाइकांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. स्वराज हा साताऱ्यातील एका मेडिकल काॅलेजमध्ये बीएचएमएसच्या दुसऱ्या वर्षामध्ये शिकत होता. त्याच्या पश्चात आई-वडील व लहान भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Dead body of future doctor of Akluj found drowned in Kanher Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.