Satara: ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या घावरीच्या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला

By नितीन काळेल | Published: July 3, 2024 07:32 PM2024-07-03T19:32:01+5:302024-07-03T19:32:32+5:30

शोधकार्यास दुसऱ्या दिवशी यश : गावापासून चार किलोमीटर अंतरावर मृतदेह आढळला 

Dead body of Ghavri farmer found washed away in stream water in Satara | Satara: ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या घावरीच्या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला

Satara: ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या घावरीच्या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला

महाबळेश्वर : घावरी (देवघरे वाडी), ता. महाबळेश्वर येथे ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेले शेतकरी बबन पांडुरंग कदम यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी शोधकार्यादरम्यान गावापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर सोनाट गावच्या हद्दीत आढळून आला. तर मृत बबन कदम यांच्या पत्नीही गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर अजून उपचार सुरूच आहेत.

महाबळेश्वर तालुक्यात मंगळवारी जोरदार पाऊस पडत होता. यामुळे ओढ्यांनाही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. मंगळवारी सकाळच्या सुमारास घावरी येथील बबन कदम (वय ७५) आणि त्यांची पत्नी सोनाबाई हे गुरांना चारण्यासाठी ओढ्यानजीक गेले होते. त्यावेळी त्यांचा तोल गेल्याने ते थेट ओढ्याच्या पुराच्या पाण्यात पडले. याचवेळी त्यांची पत्नीही बरोबर होती. या परिस्थितीत प्रसंगावधान राखत बबन कदम यांनी पत्नी सोनाबाई कदम यांना पाण्याच्या बाहेर ढकलले. यामुळे सोनाबाई वाचल्या.

मात्र, त्या गंभीर जखमी झाल्या. तर बबन कदम हे ओढ्याच्या पुरातून वाहून गेले. याची माहिती मिळताच ग्रामस्थ तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सनी शोधकार्य केले. पण, मंगळवारी दिवसभर वारे आणि जोरदार पाऊस पडत होता. यामुळे शोधकार्याला अडथळा येत होता. यामुळे दुसऱ्यादिवशी शोधकार्य सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

बुधवारी पहाटेपासूनच घावरीतील ग्रामस्थांनी ओढ्याचे पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा शोधमोहीम राबविली. महाबळेश्वर ट्रेकर्सही शोधकार्यासाठी दाखल झाले होते. या शोधादरम्यान सोनाट गावानजीक ओढ्याच्या मध्यभागी झुडपांमध्ये दगडावर बबन कदम यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या शोधकार्यात ग्रामस्थांसह महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनील भाटिया, सुर्यकांत शिंदे, अमित कोळी, अमित झाडे, जयवंत बिरामणे, सुजित कोळी, प्रज्वल केळगणे, अनिल केळगणे, संगीता कोळी आदींनी सहभाग घेतला.

Web Title: Dead body of Ghavri farmer found washed away in stream water in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.