झाडावर बिबट्याचा अन् खाली तरुणीचा मृतदेह आढळला, अजिंक्यतारा किल्ल्यावरील घटना
By दत्ता यादव | Published: March 6, 2024 10:17 PM2024-03-06T22:17:54+5:302024-03-06T22:18:16+5:30
पोलिस, वनविभागाकडून तपास सुरू
सातारा: येथील अजिंक्यतारा किल्ल्यावरील दक्षिण दरवाजाच्या पायथ्याला झाडावर बिबट्याचा तर खाली तरुणीचा मृतदेह बुधवारी सायंकाळी आढळून आल्याने साताऱ्यात खळबळ उडाली. नेमका प्रकार काय आहे, हे अद्याप समोर आले नसून शवविच्छेदन अहवालानंतरच यातील वस्तुस्थिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, नागठाणे परिसरातील १७ वर्षांची अल्पवयीन मुलगी वीस दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाली होती. याबाबत बोरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, बुधवारी दुपारी अजिंक्यताऱ्यावरील दक्षिण दरवाजाच्या बाजूकडून उग्र वास येत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी तेथे जाऊन पाहिले असता एका तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह तर झाडावर बिबट्याचा मृतदेह दिसला. एकाच ठिकाणी मृतदेह आढळून आल्याने नागरिकांनी याची माहिती सातारा शहरचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांना दिली.
त्यानंतर मस्के यांनी पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, अनिल शिरोळे, सुजित भोसले, इरफान पठाण, पंकज मोहिते आदींना त्या ठिकाणी पाठवले. या पथकाने तेथे धाव घेऊन मृतदेहांचा पंचनामा केला. तसेच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. मुलीने अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली असावी, अशी शंका उपस्थित केली जात आहे. तर बिबट्याचा झाडाच्या दोन्ही फांद्यांमध्ये अडकून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच यातील नेमका प्रकार काय आहे, हे समजणार आहे.
तिची बॅग अन् पाण्याची बाटली कुरतडली..
घटनास्थळी तरुणीचे कपडे, पैंजण, पाण्याची बाटली, बॅग सापडली आहे. ही बॅग आणि पाण्याची बाटली कुरतडण्यात आली आहे. त्यामुळे बिबट्याने की अन्य कोणत्या प्राण्याने हा प्रकार केला, हे अद्याप समोर आले नाही.