Satara: पुसेसावळीच्या तरुणाचा मृतदेह १३ तासांनंतर ताब्यात, सातारा सिव्हिलसमोर प्रचंड तणाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 11:46 AM2023-09-12T11:46:10+5:302023-09-12T11:46:57+5:30

‘त्या’ चिमुकल्यानं सगळ्यांची मने जिंकली

Dead body of Pusesawali youth detained after 13 hours, huge tension in front of Satara Civil hospital | Satara: पुसेसावळीच्या तरुणाचा मृतदेह १३ तासांनंतर ताब्यात, सातारा सिव्हिलसमोर प्रचंड तणाव

Satara: पुसेसावळीच्या तरुणाचा मृतदेह १३ तासांनंतर ताब्यात, सातारा सिव्हिलसमोर प्रचंड तणाव

googlenewsNext

सातारा : पुसेसावळी ( ता. खटाव ) येथे संतप्त जमावाने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल १३ तासांनंतर नातेवाइकांनी ताब्यात घेतला. मुख्य सूत्रधाराला जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका जमावाने घेतली होती. मात्र, पोलिस प्रशासनाने आत्तापर्यंत या प्रकरणात २३ आरोपींना अटक केली असून, अन्य आरोपींनाही अटक केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.

महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर व्हायरल झाल्यानंतर पुसेसावळी (ता. खटाव) येथे रविवारी रात्री साडेनऊ वाजता संतप्त जमावाने जाळपोळ सुरू केली. काही दुकाने तसेच प्रार्थनास्थळांना आग लावली. त्यानंतर दिसेल त्याला मारहाण करत जमावाने प्रचंड दहशत माजवली. यात नुरुलहसन लियाकत शिकलगार (वय ३०, रा. पुसेसावळी, ता. खटाव) या तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी नुरुलहसन शिकलगार याचा मृतदेह रात्री दीड वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला. या घटनेचे पडसाद उमटू नयेत म्हणून पोलिसांनी पहाटे मोबाइलचे नेटवर्क बंद केले. मात्र, तरीही दीड ते दोन हजारांचा जमाव सिव्हिलमध्ये एकत्र आला. त्यामुळे सिव्हिलसमोर प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली. 

सातारा शहर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने अग्निशमन दलासह जादा कुमक तैनात केली. सिव्हिलला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. जसजशी या घटनेची माहिती लोकांना मिळत होती. तसतसे लोक सिव्हिलमध्ये जमा होत होते. त्यामुळे तणावात आणखीनच भर पडत होती. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा कऱ्हाडचा असून, त्याला तातडीने अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका संतप्त जमावाने घेतली. संबंधिताकडून यापूर्वीही समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असून, आता तरी पोलिस प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करावी. त्याला अटक झाल्याचे समजल्यानंतरच आम्ही येथून हलणार, असे जमावाचे म्हणणे होते.

उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्यासह सातारा, कऱ्हाडमधील सामाजिक कार्यकर्ते जमावाला समजविण्यासाठी आले. त्यांनी कायदेशीर प्रक्रिया आणि आत्तापर्यंत कारवाईमध्ये झालेली प्रगती जमावाला सांगितली. परंतु जमाव मुख्य सूत्रधाराच्या अटकेवर ठाम होता. सरतेशेवटी सूर्यवंशी यांनी तुमच्या मागणीनुसार पुरवणी जबाबामध्ये तुम्ही तक्रार देऊ शकता. त्यामध्ये निष्पन्न झाल्यानंतर नक्कीच संबंधितावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर दुपारी अडीच वाजता तरुणाचा मृतदेह तब्बल १३ तासांनंतर ताब्यात घेतला. त्यानंतर जमाव पांगला.

मृत तरुणाच्या आई, पत्नीचा आक्रोश

मृत नुरुलहसन शिकलगारची आई आणि पत्नीसुद्धा सिव्हिलसमोर आली होती. त्याचा मृतदेह पाहून आई, पत्नीने प्रचंड आक्रोश केला. हा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. ज्यांनी माझ्या मुलाला मारले. त्यांनाही कडक शिक्षा द्या, अशी मागणी आई करत होती.

नुरुलहसनच्या अंगावर अनेक जखमा

नुरुलहसनचा मृतदेह सिव्हिलमध्ये आणल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला. त्यावेळी त्याच्या डोक्यामध्ये पाठीमागच्या बाजूला तीन वार तर कपाळावर दोन वार खोलवर आहेत. तसेच संपूर्ण शरीरावर काठीचे व्रण आहेत. इतक्या निर्दयीपणे त्याला मारहाण झाली असल्याचे समोर आले आहे.

पाच जिल्ह्यांचे पोलिस साताऱ्यात

या घटनेनंतर सामाजिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून साताऱ्यात पाच जिल्ह्यांतील पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. यामध्ये सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी पोलिसांचा समावेश होता. यातील बहुतांश पोलिस कर्मचारी पुसेसावळी येथे तैनात करण्यात आले आहेत.

साताऱ्यात चौकाचौकांत बंदोबस्त

सातारा शहरातील प्रार्थनास्थळे आणि चौकाचौकांत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी ही खबरदारी घेतली होती.

‘त्या’ चिमुकल्यानं सगळ्यांची मने जिंकली

दीड-दोन हजारांच्या जमावात आठ-दहा वर्षांचा एक चिमुकला होता. या चिमुकल्याला या घटनेचं सारं काही माहीत होतं; पण ‘तो’ प्रत्येकाला सांगत होता. भांडू नका, कोणाला मारू नका, चला आपापल्या घरी, हे ऐकून सारेच अवाक् झाले. एखाद्या मोठ्या माणसासारखे ‘तो’ बोलत होता. त्याच्याकडे पाहून पोलिसांचाही ताण थोडासा कमी झाला.

Web Title: Dead body of Pusesawali youth detained after 13 hours, huge tension in front of Satara Civil hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.