बेवारस मृतदेहाची लोणंद कचरा गाडीतून फरपट-माणुसकीला काळिमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 11:38 PM2018-06-15T23:38:25+5:302018-06-15T23:38:25+5:30
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एका अनोळखी इसमाचा मृतदेह गेल्या तीन दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रातील कचऱ्यात फेकून देण्यात आला. दरम्यान, दुर्गंधी सुटल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तक्रार केली.
लोणंद : अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एका अनोळखी इसमाचा मृतदेह गेल्या तीन दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रातील कचऱ्यात फेकून देण्यात आला. दरम्यान, दुर्गंधी सुटल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तक्रार केली. तेव्हा चक्क कचरा गाडीतून या बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. माणुसकीला काळिमा फासणाºया लोणंदमधील या धक्कादायक प्रकाराचा सर्व स्तरातून जोरदार निषेध होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका अनोखळी इसमाचा लोणंदनजीक अपघातात मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच बेवारस मृतदेहाला लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रातील शवविच्छेदन विभागात ठेवण्यात आले. शासकीय नियमानुसार एखादा मृतदेह चौकशीसाठी ७२ तास शवविच्छेदन गृहात ठेवला जातो. यानंतर पोलिसांकडून अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, तीन दिवसांपूर्वीमृत्यू होऊनही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत. मृतदेह पूर्णपणे सडल्याने त्याची परिसरातदुर्गंधी पसरली होती. दुर्गंधीमुळे आरोग्य केंद्राच्या आवारात उभे राहणेही मुश्कील बनले होते.
याबाबत परिसरात राहणाºया नागरिकांनी तातडीने याची माहिती वैद्यकीय अधिकाºयांना दिली. त्यानी केलेल्या तपासणीनंतर ही दुर्गंधी मृतदेहाची असल्याची बाबसमोर आली.
यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची धावपळ सुरू झाली. लोणंद नगरपंचायतीची कचरागाडी आरोग्य केंद्रात बोलविण्यात आली. या गाडीतूनच बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, माणुसकीला काळिमा फासणाºया या घटनेमुळे ेलोणंदमधील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
लोणंद नगरपंचायतीच्या याच कचरागाडीतून बेवारस मृतदेहाला अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्रात शीतगृह नसल्याने अनेकवेळा या भागात मृतदेहाची दुर्गंधी पसरते. सोशल मीडियावर प्रसारित बातमी चुकीची असून, या मृतदेहाचे शवविच्छेदन करून ७२ तास पूर्ण झाल्यानंतरच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
- डॉ. व्ही. ए. गोखले,वैद्यकीय अधिकारी
बेवारस मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी आरोग्य विभागाच्या गाडीचा उपयोग केला गेला. त्यावेळी गाडीमध्ये कचरा नव्हता. या मृतदेहाबरोबर नगर पंचायतीचे कर्मचारीही होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारे या बेवारस मृतदेहाची हेळसांडझाली नाही.
- शंकर शेळके, नगरपंचायत, आॅफिस सुप्रिडेंट