साताऱ्यातील कण्हेर धरणात मृत माशांचा खच, कारण मात्र अनभिज्ञ
By सचिन काकडे | Published: May 22, 2024 07:19 PM2024-05-22T19:19:44+5:302024-05-22T19:20:34+5:30
नागरिकांमधून तर्क-वितर्क : चौकशीची मागणी
सातारा : सातारा तालुक्यात असलेल्या कण्हेर धरणातील मासे अचानक मृत्यूमुखी पडले असून, धरणाच्या काठावर मृत माशांचा अक्षरश: खच पडला आहे. अनेक वर्षांनंतर धरणातील मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना घडल्याने नागरिकांमधून तर्क-वितर्क लढविले जात आहे.
सातारा-मेढा मार्गावर असलेल्या कण्हेर धरणाची पाणीसाठवण क्षमता १०.१० टीएमसी इतकी आहे. या धरणातील पाणीपातळी उन्हामुळे खालावली असून, धरणात सध्या दीड टीएमसी पाणी उपलब्ध आहे. बुधवारी दुपारी काही नागरिकांना या धरणातील पाण्यावर मृत मासे तरंगताना आढळून आले. तसेच काही ठिकाणी काठावरही मृत माशांचा खच पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. धरणातील पाणीपातळी खालावल्यानंतर माशांना पाण्यातून मिळणारा प्राणवायू अपूरा पडू लागतो. त्यामुळे ते मृत्यूमुखी पडले असावेत, असा कयास काही नागरिकांनी बांधला.
मात्र, यामागे वेगळेच कारण असल्याचा आरोप करत जिल्हा प्रशासनाने या प्रकरणासह धरणात सुरू असलेल्या मासेमारीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी गरुडा साम्राज्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी केली आहे. तशा आशयाचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना दिले आहे.