महागाईत एकादशी..
By Admin | Published: July 8, 2014 11:49 PM2014-07-08T23:49:19+5:302014-07-09T00:02:21+5:30
दुप्पट कसं खाशी ? फराळही खातोय भाव : एका माणसाचा उपवास तब्बल दीडशे रुपयांना
सातारा : एकादशी दुप्पट खाशी असं म्हणून समृध्द अन्नसंस्कृतीची झलक देणाऱ्या उपवासातील जिन्नस खरेदी सर्वसामान्यांना महाग पडू लागली आहे. म्हणूनच एकादशी दिवशी दुप्पट कसं खाशी, असा सवाल सातारकरांना पडला आहे. कारण एका दिवसाचा एका माणसाचा उपवासाचा खर्च तब्बल दीडशे रुपयांच्या घरात पोहोचला आहे.
विठ्ठलनामाच्या जयघोषात वैष्णवांचा मेळा पंढरपुरात पोहोचला. विठ्ठलाच्या भेटीसाठी आसुसलेले वारकरी त्याच्या दर्शनाने तिथे तृप्त होतील, तर कार्यबाहुल्यांमुळे ज्यांना जाता आले नाही, असे अनेकजण घरीच उपासना करतील. ‘एकादशी दुप्पट खाशी’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. या म्हणीप्रमाणेच अखंड दिवस उपवासाचा फराळ करत अनेक जण दिवस व्यतीत करतात.
सकाळी साबुवडा, दुपारी खिचडी, संध्याकाळी उपवासाचे थालीपीठ आणि रात्री वरीच्या तांदळाचा भात अन् शेंगदाण्याची आमटी असा फर्मास बेत आखलेला असतो. तसेच वेळ मिळेल तेव्हा वेफर्स, राजगिरा, शेंगदाण्याचा लाडू आदी जिन्नस असतातच.
पूर्वीपासून एकादशी अशी साजरी करण्याची सवय लागलेल्यांना आता वाढत्या महागाईचे चटके बसू लागले आहेत. वीस रूपये किलो असलेल्या बटाट्यांनी तिशी ओलांडली आहे, तर रताळ्यांनी पन्नाशी गाठली आहे. मंडईतील हे दर ऐकून सामान्य माणूस हादरला आहे.
४उपवासाच्या दिवसांत वेगळ्या चवीचे असे तयार थालीपिठाचे पीठ मिळते. शहर व परिसरातील उत्पादक हे पीठ सुमारे २१५ रुपये किलो दराने विकतात. एकादशीनिमित्त या पिठाला चांगली मागणी असते. पण यंदा गुजरातहून आलेले पीठ अवघ्या शंभर रूपयांत एक किलो मिळते. हे पीठ उपवासकर्त्यांना आणि गृहिणींना खुणावत आहे. परस्परांच्या ओळखीने अनेकांनी या एकादशीला हे पीठ घरी नेले आहे. वाढत्या महागाईत या पिठाने आधार दिला आहे. रमजान महिन्यामुळे तेजी
रमजान महिन्यामुळे फळांना मागणी आहे. यातच एकादशी आल्यामुळे खजूर आणि फळांचे दर चांगलेच वाढले आहेत. मागणी वाढल्यामुळे दरांच्या किंमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे फळांच्या दरातही तीस ते पस्तीस टक्क्यांनी वाढ झाल्याचे बाजारपेठेतील चित्र दिसत आहे. (प्रतिनिधी)