धोम जलाशयात तरुणाचा मृत्यू
By Admin | Published: May 2, 2017 11:57 PM2017-05-02T23:57:22+5:302017-05-02T23:57:22+5:30
धोम जलाशयात तरुणाचा मृत्यू
वाई : महाराष्ट्र दिन, कामगार दिनाची सुटी असल्याने मित्रांसमवेत पोहायला गेलेल्या तरुणाचा धोम जलाशयात बुडून मृत्यू झाला. तब्बल अठरा तासांनंतर मृतदेह शोधण्यात यश आले. ओंकार ज्ञानेश्वर वाडकर (वय १६, रा. मोर्जेवाडा, चिखली, ता़ वाई) असे मृत तरुणाचे नाव आहे.
वाई पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, ओंकार वाडकर हा सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास दोन मित्रांसमवेत गावालगत असलेल्या धोम धरणाच्या जलाशयात पोहण्यासाठी गेला होता़ ओंकारला पोहण्यास येत होते़ तो एकटाच पाण्यात पोहत होता. यावेळी त्याचे मित्र काठावर बसले होते़
पोहून झाल्यावर ओंकार काठावर आला व पुन्हा पोहण्यासाठी
पाण्यात गेला. तो पाण्याच्या
जास्त आत गेल्याने त्याला
पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला.
ओंकार बुडत असल्याचे लक्षात येताच मित्रांनी आरडा-ओरडा करण्यास सुरुवात केली. गावातील काही लोकांना फोनवरून संपर्क साधला़ त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली़ दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले़
बराचवेळ शोध घेऊनही ओंकार सापडला नाही. त्यामुळे महाबळेश्वर टे्रकर्स व शासकीय मुगाव येथे असणारी शासकीय नाव व कर्मचारी यांना पाचरण करण्यात आले़ सायंकाळी चारपासून सुरू
असलेली शोध मोहीम रात्रभर चालू होती.
दरम्यान, मंगळवारी सकाळी सव्वानऊ वाजता ओंकारचा मृतदेह गाळात रूतलेल्या अवस्थेत आढळला़ त्यानंतर ही मोहीम थांबविण्यात आली. (प्रतिनिधी)
चांगला पोहणारा मित्र गमावला...
धोम जलाशयावर तिघेजण गेले पण पोहता येत असल्याने केवळ ओंकारच पोहत होता. दुसऱ्यांदा पाण्यात गेला तो परत आलाच नाही. यामुळे मित्रांना धक्का बसला आहे. ओंकार नुकताच दहावीत गेला होता़ एकुलता एक, हुशार मनमिळावू ओंकारच्या जाण्याने मोर्जेवाडा, चिखलीसह संपूर्ण पश्चिम भागावर शोककळा पसरली आहे.