मायणी प्राथमिक आरोग्य केंद्रात मरणाची गर्दी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:35 AM2021-04-26T04:35:04+5:302021-04-26T04:35:04+5:30
मायणी : सर्वत्र संचारबंदी, दुकानात पाचपेक्षा अधिक लोक असतील तर कारवाई, जिल्हाबंदी, मात्र मायणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेरील ...
मायणी : सर्वत्र संचारबंदी, दुकानात पाचपेक्षा अधिक लोक असतील तर कारवाई, जिल्हाबंदी, मात्र मायणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेरील बाजूस स्वॅब देण्यासाठी रोज गर्दी होत आहे. ना सोशल डिस्टन्स, ना रांग, त्यामुळे या ठिकाणी कोणते नियम आहेत का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी, जिल्हाबंदी, अत्यावश्यक सेवा व दुकाने सोडून संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवल्या आहेत. लग्नसमारंभासाठी २५ लोकांची परवानगी व दोन तासांचा वेळ, तसेच अत्यावश्यक सेवेच्या दुकानासह इतर ठिकाणी पाचपैकी अधिक व्यक्ती एकत्र आल्या की कारवाई, असे अनेक निर्बंध घातले आहेत.
मात्र हे सर्व नियम सर्वसामान्यांसाठीच आहेत का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. मायणी व मायणी परिसरामध्ये कोरोनाबाधित रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणारे व कोरोनासदृश लक्षणे जाणवू लागलेले अनेकजण मायणी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी रोज सकाळी येत आहेत.
या ठिकाणी सामाजिक अंतराचे भान न ठेवता तपासणीसाठी आलेल्या व्यक्ती मोठी गर्दी करत आहेत. या ठिकाणी संबंधित विभागाचा कोणीही कर्मचारी या गर्दीवर नियंत्रण ठेवताना दिसत नाही. तसेच येणारे लोकही याकडे एवढ्या गांभीर्याने पाहत नाहीत. या तपासणीसाठी येणाऱ्या व्यक्तींपैकी काही संशयित कोरोनाबाधित रुग्ण असल्याकारणाने इतर सर्वसामान्य नागरिकांना लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(चौकट)
लसीकरण ठप्प!
मायणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा शनिवारी दुपारी चार वाजल्यापासून पूर्ण संपला आहे. रविवारी सकाळच्या सत्रातही साठा न आल्याने या ठिकाणचे कोरोना लसीकरण पूर्ण थांबले आहे. त्यामुळे शासनाने या ठिकाणी जास्तीत जास्त व वेळेत लसीचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
२५मायणी
मायणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तपासणीसाठी मोठी गर्दी होत आहे. (छाया : संदीप कुंभार)