वीज कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:39 AM2021-04-16T04:39:28+5:302021-04-16T04:39:28+5:30
उंब्रज : इंदोली येथे विद्युत तार तुटल्यामुळे शेतकऱ्याचा शॉक बसून मृत्यू झाला होता. हा मृत्यू विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी ...
उंब्रज : इंदोली येथे विद्युत तार तुटल्यामुळे शेतकऱ्याचा शॉक बसून मृत्यू झाला होता. हा मृत्यू विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणा व निष्काळजीपणामुळे झाला असल्याची तक्रार उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी मंथन दादासाहेब चव्हाण (रा. इंदोली, ता. कराड) यांचे वडील दादासाहेब शिवाजी चव्हाण (वय ५६) हे २ एप्रिल रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास चव्हाणची पट्टी नावचे शिवारातील विहिरीवरील मोटर चालू करून उसाच्या पिकास पाणी देण्याकरिता गेले होते. तेव्हा एमएसईबीच्या खांबावरून गेलेल्या थ्री फेज तारांमधील एक तार तुटून उसाच्या शेतात पडल्याने दादासाहेब चव्हाण उसास पाणी देत असताना तुटून पडलेल्या तारेवर त्यांचा पाय पडल्याने शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
उंब्रज येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात दादासाहेब चव्हाण हे सुमारे सात वर्षांपासून वारंवार लेखी व तोंडी तक्रारी देत होते की, शेतालगत असलेला इलेक्ट्रिक पोल हा वाकडा झाला आहे. त्यावरील ताराही शेतात झुकल्याने धोकादायक झाल्या आहेत. त्या तक्रारींकडे संबंधितांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे महावितरण कंपनीचे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणा व निष्काळजीपणाच दादा चव्हाण यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार फिरोज शेख करीत आहेत.