ऐंशी टन वजनाच्या महाकाय गव्याचा मृत्यू
By admin | Published: February 5, 2016 10:55 PM2016-02-05T22:55:32+5:302016-02-05T23:43:07+5:30
बोंद्री जंगल : झुंजीवेळी झाडात मान अडकल्यानेगमवावा लागला प्राण
मणदुरे : दोन जंगली गव्यांच्या झुंजीत एका दोन टनी वजनाच्या गव्याचा झाडात अडकून मृत्यू झाला. ही घटना बोंद्री गावच्या वनविभागाच्या राखीव जंगलात घडली. वनविभागाच्या फिरत्या पथकास हा गवा गुरुवारी मृतावस्थेत आढळला.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाटणच्या पश्चिमेस बोंद्री हे गाव असून लगतच डोंगर आहे. याच ठिकाणी वनविभागाचे राखीव क्षेत्र आहे. हा विभाग तीव्र उताराचा व दाट झाडीचा असल्याने परिसरात जंगली गव्यांनी अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. जाईचीवाडी येथील धोंडिराम पवार यांना गव्याने जखमी केले होते.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ‘दोन जंगली गव्यांची झुंज लागली होती. एक नर जातीचा गवा झुंजीत तीव्र उताराने घरंगळत खाली आला. दोन झाडांच्या मध्यभागी या गव्याची मान अडकली व मागचे दोन पाय तोंडाजवळ येऊन झाडामध्ये अडकले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी वनविभागाचे अधिकारी जयवंत कवर व वनपाल संजय जाधव हे नेहमीप्रमाणे गस्त घालत असताना त्यांच्या निदर्शनास ही घटना आली.
वनविभागाचे अधिकारी सहायक वनसंरक्षक एस. व्ही. मुळे, जयवंत कवर, एस. व्ही. लोखंडे, प्रमोद पाटील, संजय जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. पशुवैद्यकीय विस्ताराधिकारी डॉ. एम. जे. मोरे यांनी शवविच्छेदन केले. या गव्यास त्याचठिकाणी ग्रामस्थांच्या मदतीने अंत्यसंस्कार केले. (वार्ताहर)
अंत्यसंस्कारासाठी दोन ट्रॉली लाकूड
या दोन टन वजनाच्या महाकाय गव्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल दोन ट्रॉली लाकूड लागले. तीव्र उताराच्या जंगलातच त्याच्यावर अंत्यविधी करण्यासाठी बोंद्री ग्रामस्थांनीच घरातून लाकडे आणली.