नायगावात मतदानासाठी आलेल्या वृद्धेचा मृत्यू
By admin | Published: February 21, 2017 11:34 PM2017-02-21T23:34:37+5:302017-02-21T23:34:37+5:30
खंडाळा तालुक्यात ७५.३८ टक्के मतदान : गट, गणाच्या ५१ उमेदवारांच्या भवितव्याचा उद्या फैसला
खंडाळा/ शिरवळ : खंडाळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता काही ठिकाणी किरकोळ वादावादी वगळता शांततेने चुरशीने ७५.३८ टक्के मतदान झाले. यावेळी नायगाव गणामध्ये मतदानाकरिता आलेल्या ८३ वर्षीय वृद्धेला अस्वस्थ वाटू लागल्याने तिचा खासगी रुग्णालयात उपचारापूर्वी मृत्यू झाला. दरम्यान, तीन जिल्हा परिषद व सहा पंचायत समितीच्या गणांसाठी ५१ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद
झाले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या खंडाळा तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गटांसाठी व पंचायत समितीच्या सहा गणांसाठी मंगळवारी मतदान झाले. यामध्ये जिल्हा परिषदेच्या शिरवळ, खेड बुद्रुक, भादे तर पंचायत समितीच्या शिरवळ, पळशी, भादे , बावडा, नायगाव, खेड गणांसाठी मतदारांनी चुरशीने मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.
नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावर मतदानाकरिता आलेल्या ठकुबाई एकनाथ नेवसे (वय ८३, रा. नायगाव, ता. खंडाळा) यांना मतदान केंद्रामध्ये अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने नायगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यामुळे नायगाव येथील केंद्रावर काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
एकूणच, खंडाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिरवळ गटासाठी ७८.४५ टक्के मतदारांनी , भादे गटासाठी ७४.८६ टक्के मतदारांनी, खेड बुद्रुक गटासाठी ७३.४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
खंडाळा तालुक्यातील ८७ हजार ३२० मतदारांपैकी ६५,८२४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, यामध्ये ३४,७७० पुरुष तर ३१,०५४ महिला मतदारांचा समावेश आहे. दुपारी दोननंतर शिरवळ, भादे, अहिरे, बावडा, विंग, पिंपरे, मिरजे-मिरजेवाडी, नायगाव, धनगरवाडी, लोणी, कन्हेरी तसेच ग्रामीण भागामधील मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. गुरुवार, दि. २३ रोजी सकाळी १० वाजता खंडाळा पंचायत समितीच्या सभागृहात होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीमध्ये मिरजे ता.खंडाळा येथील मतदान केंद्रामधील यंञात तांञिक अडचणी निर्माण झाल्याने काही काळ मतदानप्रक्रियेमध्ये व्यत्यय आला होता. यावेळी मतदान अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलल्याने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. संपूर्ण तालुक्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे. (प्रतिनिधी)