वडिलांच्या पुण्यतिथीला मुलीचाही मृत्यू

By admin | Published: May 26, 2017 11:03 PM2017-05-26T23:03:28+5:302017-05-26T23:03:28+5:30

वडिलांच्या पुण्यतिथीला मुलीचाही मृत्यू

Death of a father in the death of his father | वडिलांच्या पुण्यतिथीला मुलीचाही मृत्यू

वडिलांच्या पुण्यतिथीला मुलीचाही मृत्यू

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : वडिलांचा अपघातात मृत्यू झाला होता. बरोबर बारा वर्षानंतर त्याच दिवशी एकुलत्या एक मुलीचाही अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना येथील विकासनगरमध्ये शुक्रवारी दुपारी घडली.
सायली अनील चव्हाण (वय १७, रा. महागाव ता. सातारा) असे दुर्देवी युवतीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, सायली चव्हाण आणि मामेभाऊ सचिन बोरगे (वय ३०,रा. खटाव) हे शुक्रवारी दुपारी खटावकडे दुचाकीवरून निघाले होते.
विकासनगर येथील पेट्रोलपंपावर पेट्रोल भरून ते रस्त्यावर येत होते. याचवेळी एसटी दहिवडीकडे निघाली होती. या एसटीच्या डाव्या बाजुला दुचाकीची धडक बसली. पाठीमागे बसलेली सायली उडून एसटीच्या पाठीमागील चाकाखाली सापडली. सचिन बाजूला फेकला गेला. एसटीचे चाक सायलीच्या अंगावरून गेल्याने तिचा मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शींनी आरडाओरड करून मुलगी चाकाखाली सापडल्याचे एसटी चालकाला सांगितले. मात्र हे चालकाच्या लक्षात आले नाही. कसलातरी आवाज आल्याने चालकाने ब्रेक लावला. चाकाचे व्रण डांबरावर दिसून येत होते. जमाव मारहाण करेल, या भितीने चालक आणि वाहकाने शहर पोलिस ठाण्यात येऊन अपघाताची माहिती दिली.
अपघाताचे वृत्त विकासनगर आणि महागाव परिसरात समजताच नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत सायलीचा मृतदेह त्याच अवस्थेत होता. नातेवाईकांनी सायलीचा मृतदेह पाहातच हंबरडा फोडला. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांनाही अश्रू आवरता आले नाहीत.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमाव पांगविला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून सायलीचा मृतदेह जिल्हा रुग्णायात आणला. या ठिकाणीही महागाव येथील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
दरम्यान, सायली ही वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी विद्यालयात शिकत होती. ती शिक्षणात हुशार होती. गुरूवारी तिचा निकाल लागला. त्यात ती महाविद्यालयामध्ये दुसरी आल्याचे नातेवाईक सांगत होते.
सायली ही एकुलती एक होती. तिची आईही दुर्धर आजाराने त्रस्त आहे. सायलीवरच ती अवलंबून होती. मात्र एकुलती एक असलेल्या सायलीचा असा अपघाती मृत्यू झाल्याने तिच्या आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
असाही योगायोग
सायली चव्हाण हिच्या वडिलांचा २६ मे २००५ रोजी पाटण येथील मल्हार पेठ पोलिस चौकीसमोर अपघाती मृत्यू झाला होता. बरोबर बारा वर्षानंतर २६ मे २०१७ ला सायलीचाही अपघातही मृत्यू झाला. या दुर्देवी योगायोगाची महागावमध्ये शुक्रवारी दिवसभर चर्चा होती. तिच्या वडिलांच्या दुचाकीलाही वाहनाने धडक दिली.

Web Title: Death of a father in the death of his father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.