साताऱ्यात नामांकित पैलवानाचा स्वाईन फ्लूने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 09:11 PM2018-09-30T21:11:07+5:302018-09-30T21:11:11+5:30
अंगापूर : अंगापूर वंदन (ता. सातारा) येथे स्वाईन फ्लूने नामांकित पैलवान अनंत अप्पाजी कणसे (वय ५०) यांचा पुणे येथील रुग्णालयात रविवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, स्वाईन फ्लूने मृत्यू झालेला जिल्ह्यातील हा सतरावा बळी आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून कणसे हे ताप, सर्दी, खोकल्याने बेजार झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी गावातीलच खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी त्यांना दाखल केले होते. परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणी केल्यानंतर कणसे यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी तत्काळ पुणे येथील खासगी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. तेथे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांना श्वासोच्छवास घेताना त्रास होत होता. दरम्यान, रविवारी सकाळी अचानक उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे अंगापूर परिसरात खळबळ उडाली आहे. लोकांनी स्वाईन फ्लूची धास्ती घेतली आहे. आरोग्य विभागाने या परिसरात येऊन तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.
नामांकित मल्ल अन् व्यायामाची आवड..
अनेक कुस्ती मैदाने गाजवलेले मजबूत शरीरयष्टीचे असणारे बाळू पैलवान हे अंगापूर वंदन विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन होते. त्यांचा राजकीय, सामाजिक क्रीडा क्षेत्रात नेहमी वावर असायचा. त्यांचा स्वाईन फ्लूच्या आजाराने मृत्यू झाल्याने अंगापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.