धान्यातील पावडरच्या वासाने चिमुकल्या बहिण भावाचा मृत्यू, शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव
By संजय पाटील | Published: February 14, 2023 09:14 PM2023-02-14T21:14:16+5:302023-02-14T21:14:23+5:30
कऱ्हाड तालुक्यातील मुंढे येथे ही हृदयद्रावक घटना घडली.
कऱ्हाड : धान्यात टाकल्या जाणाऱ्या पावडरच्या उग्र वासामुळे अत्यवस्थ झालेल्या सख्या बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कऱ्हाड तालुक्यातील मुंढे येथे ही हृदयद्रावक घटना घडली. याबाबतची नोंद कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
श्लोक अरविंद माळी (वय ३ वर्ष) व तनिष्का अरविंद माळी (वय ७) असे मृत्यू झालेल्या बहिण-भावाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढे येथील अरविंद माळी यांच्या घरात धान्य साठवून ठेवत असताना त्यामध्ये पावडरीचा वापर केला गेला होता. या उग्र वासामुळे श्लोक व तनिष्का यांना उलट्यांचा त्रास झाला. सोमवारी, दि. १३ तीन वर्षाच्या श्लोकला उलट्या व खोकल्याचा जास्त त्रास होत असल्याने नातेवाईकांनी त्याला कऱ्हाडातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
तेथे उपचार सुरू असताना सोमवारी त्याचा मृत्यू झाला. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी त्याची मोठी सात वर्षांची बहीण तनिष्का हिलाही उलट्या व खोकल्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिलाही नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, उपचार सुरू असताना तिचाही मंगळवारी मृत्यू झाला. तीन वर्षाच्या श्लोकच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यामध्ये शरीरात अंतर्गत अति रक्तस्त्रावामुळे व शरीरातील पाणी कमी झाल्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर तनिष्काचे मंगळवारी सायंकाळी शवविच्छेदन केले असून त्याचा अहवाल पोलिसांना अद्याप मिळाला नसल्याने तिच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव तपास करीत आहेत.